मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अन् उपोषणाची सांगता

उपोषणकर्त्याच्या लढ्याला यश

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
कारंजा लाड
karanja-lad-protesters-struggle तालुयातील धनज बु. येथील विविध प्रलंबित विकासकामांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी सोमवार, ७ सप्टेंबरपासून कारंजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. गावातील रस्ते, आरोग्य सुविधा, वाढीव गावठाणाचे नियमितीकरण आणि पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या तीन तासात मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अमोल पाटणकर यांनी संबंधित अधिकार्‍यांशी संवाद साधल्याने उपोषणाची सांगता झाली.

karanja 
 
धनज बु. येथील प्रलंबित प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांकडे निवेदने देऊन मागण्यांचा पाठपुरावा केला. मात्र, मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला होता. या आमरण उपोषणात विशाल तुळशीराम अघमे हे उपोषणकर्ते असून, यासाठी त्यांना सय्यद अबरार सय्यद मुसा यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दर्शविला होता. विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे प्रशासनासमोर प्रलंबित विकासकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्ते, आरोग्य, गावठाण नियमितीकरण आणि घरकुल यांसारख्या मूलभूत प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत होती. शिवाय प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन कोणती भूमिका घेते, याकडे धनज बु. ग्रामस्थांचे लक्ष लागले होते.
 
धनज बु. ते नागलवाडी, भाबदेवी, हिवरा लाहे आणि झोडगा या गावांना जोडणार्‍या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या मार्गाचे लवकरात लवकर नवीन दुहेरी पदरी डांबरीकरण करण्यात यावे, जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या बाजूच्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, श्री मोहनलाल भन्साळी शाळेच्या बाजूच्या नवीन रस्त्याचे डांबरीकरण तसेच तेलीपुरा ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे नवीन काँक्रिटीकरण करण्यात यावे, धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रात आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने उपोषण सोडण्यात आले.