गोंदिया
body found in-water तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माकडी येथे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रंजीत रुकणलाल दमाहे (२५) असे मृत युवकाचे नाव आहे. पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, युवक पाण्याने भरलेल्या खड्ड्यापर्यंत कसा पोहोचला, याबाबत स्पष्टता नसल्याने त्याचा मृत्यू अपघाती आहे, की आत्महत्या किंवा घातपात याबाबतचे गूढ कायम आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत रंजीत हा शनिवारी ५ सप्टेंबर रोजी आपल्या मामाच्या गावाला गेला होता. तेथून रविवारी ६ सप्टेंबर रोजी तो माकडी येथील आपल्या घरी परतण्यासाठी निघाला. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, सोमवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास दासगाव मार्गावरील गावातीलच पाण्याने भरलेल्या खड्ड्यात रंजीतचा मृतदेह आढळून आला. मृतदेह दिसताच ग्रामस्थांनी तत्काळ रावणवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. रंजीत अचानक बेपत्ता होणे आणि त्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आढळणे यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून ही घटना अपघाती आहे की युवकाने आत्महत्येचे पाऊल उचलले, अथवा यामागे घातपात आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, शवविच्छेदन अहवाल तसेच पोलिस तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी ललित रुकणलाल दमाहे (३०) यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार रामदास शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.