चंद्रपूर,
old sarai building प्रदीर्घ संघर्ष आणि प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरच्या ऐतिहासिक 104 वर्ष जुन्या सराय इमारतीला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांच्या कायदेशीर लढ्यालाही शेवटी यश आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर शासनाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली. अशोक जयराज सिंह व मधुसूदन रूंगठा यांनी अॅड. अमोल मारडीकर व अॅड. रत्ना सिंह यांच्यामार्फत या वारसा वास्तूला पाडण्यापासून वाचवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी शासनाची बाजू मांडताना, प्राचीन स्मारके व पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, 1960 च्या कलम 3 अंतर्गत अंतिम अधिसूचना जारी केली आहे.
सराय इमारत ही गट क्रमांक 1663, रेल्वे स्थानक रोड, सराई वॉर्ड, चंद्रपूर येथे असून, तिचे बांधकाम 1921 मध्ये ब्रिटिश काळात झाले होते. एका शतकाहून अधिक काळ ती प्रवाशांसाठी विश्रामगृह म्हणून कार्यरत होती. वसाहतकालीन वास्तुकला, कमानीदार व्हरांडे आणि दगडी बांधकामासाठी ती ओळखली जाते. ही विदर्भातील 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या सार्वजनिक वास्तुकलेचा एक दुर्मिळ ठेवा आहे.
महानगरपालिकेने ती जीर्ण झाल्याचे कारण देत पाडण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही इमारत चंद्रपूरच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे आणि ती पाडली जाऊ नये, तर तिचे जतन केले जावे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता.
संरक्षित दर्जा मिळाल्याने आता या old sarai building आवारात कोणताही बदल, पाडकाम, बांधकाम किंवा दुरुस्ती करण्यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. इमारतीचे जतन आणि जीर्णोद्धार वारसा नियमांनुसार केला जाईल. चंद्रपूरच्या नागरिकांनी आणि वारसाप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.