१५.५ सेकंदात फोडली दहीहंडी

१ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
वर्धा
dahi-handi  नवदुर्गा सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाच्या संयुक्त वतीने ५ रोजी स्थानिक शास्त्री चौकात आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत शिरसगाव येथील शिव तांडव गोविंदा पथकाने १५.५ सेकंदात दहीहंडी फोडून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले.
 
dahi handi 1
कार्यक्रमाला खासदार अमर काळे, राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकूर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नागपूर शहर अध्यक्ष निशिकांत, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार दादाराव केचे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेेश सराफ डॉ. उदय मेघे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने दहीहंडीसह राधा-कृष्ण वेशभूषा, लोकनृत्य स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. ५० हून अधिक मुलांनी राधा-कृष्ण वेशभूषेत सहभाग घेतला. समितीतर्फे सर्वोत्कृष्ट पाच राधा-कृष्णांना ढाल आणि प्रमाणपत्रं देण्यात आली. सहभागी सर्व चिमुकल्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्रे देण्यात आली. फोक डान्स स्पर्धेत वर्धा येथील वेदिका डान्स अकादमीने महाराष्ट्रीय लोकनृत्य गोंधळ सादर करून १५ हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले. के. व्ही. डान्स ग्रुपने ओडिसा लोकनृत्य सादर करून द्वितीय, सॅम डान्स अकादमीने कोळी नृत्य आणि स्नेहल डान्स अकादमीने आदिवासी नृत्य सादर करून तृतीय पारितोषिक पटकावले.
दहीहंडी स्पर्धेत ८ संघांनी सहभाग नोंदविला होता. वॉरियर्स गोविंद पथकाने १६.२१ सेकंदात दहीहंडी फोडून द्वितीय तर कालभैरव गोविंदा पथकाने १८.३० सेकंदात दहीहंडी फोडून तृतीय पारितोषिक पटकावले. उर्वरित पाच गोविंदा पथकांना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली.