गोंदिया
dahi-handi-festival आमगाव येथील अष्टविनायक दहीहंडी उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच अचानक पायर्यांचा स्लॅब कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. दरम्यान, त्यापैकी पाच जणांना सोमवारी सुट्टी देण्यात आली असून एकावर उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमगाव येथील अष्टविनायक दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने रविवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असता रात्री ८ वाजताच्या सुमारास कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच कार्यक्रम बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी अनेक जण जवळील इमारतींवर तर काहीजण पायर्या किंवा उंच ठिकाणी उभे राहून दहीहंडीचा आनंद घेत होते. त्यातच कार्यक्रमस्थळापासून काही अंतरावरील भिंतीलगत असलेल्या पायर्यांच्या स्लॅबवर अनेक लोक उभे असताना अचानक त्या पायर्यांचा स्लॅब कोसळल्याने नागरिक खाली पडले. त्यामुळे परिसरात आरडाओरडा सुरू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले.
जखमींना तत्काळ आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर १२ जणांना घरी सोडले, तर गंभीर जखमी झालेल्या ६ जणांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अधिक उपचार घेत असलेल्या ६ जणांपैकी सोमवारी सायंकाळपर्यंत ५ जणांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती असून वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जखमीवर उपचार सुरु आहे. या दुर्घटनेनंतर उत्सवस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि प्रशासनाने तातडीने परिसर सुरक्षित करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात नेमका कशामुळे घडला, स्लॅब कोसळण्यामागे अतिगर्दी कारणीभूत होती का किंवा बांधकामातील त्रुटी होती, याबाबत प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे.