वाशीम
development-of-tandas संत सेवालाल महाराज बंजारा-लबाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून वाशीम जिल्ह्यातील तांड्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी जिल्ह्यातील १४९ तांड्यांच्या विकासकामांचा मुंबई येथे महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला.

बैठकीत तांड्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मूलभूत सुविधांसह महसुली दर्जा, ग्रापं निर्मिती व विभाजन, स्मशानभूमी तसेच शैक्षणिक सुविधांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.वाशिम जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायत विभागाचे प्रस्ताव तसेच महसुली दर्जा मिळण्यासाठीचे २२ प्रस्ताव पुढील प्रशासकीय कार्यवाहीद्वारे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली.स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध असलेल्या तांड्यांमध्ये जागेची उपलब्धता हा प्रश्न सोडविण्यासाठी गावातील ई-लास व सी-लास जमीन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.तांड्यांमधील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती व मूलभूत सुविधांबाबत देखील चर्चा करण्यात आली. तांड्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित व चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस योजनेचे समन्वयक डॉ.जगदीश सकवान, प्रशासकीय अधिकारी रविंद्र राठोड, सचिन पानझाडे, निलेश जाधव, अक्षय राठोड तसेच माजी अशासकीय सदस्य रमेश पवार, गणेश चव्हाण व अभिषेक चव्हाण उपस्थित होते. वाशीम जिल्ह्यातील प्रत्येक तांड्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रलंबित प्रशासकीय बाबींना गती देणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ तांड्यांपर्यंत पोहोचविणे, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.