दिशा सालियान प्रकरणाला नवे वळण 'सचिन वाझे' माफीचा साक्षीदार होणार?

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
मुंबई
disha salian death case दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवल्यानंतर राजकीय आणि कायदेशीर वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, सध्या तुरुंगात असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचा दावा दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांचे वकील अ‍ॅड. निलेश ओझा यांनी केला आहे.
 

disha salian death case sachin vaze may turn approver as cbi probe begins 
दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलीच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांनंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. अ‍ॅड. निलेश ओझा यांच्या म्हणण्यानुसार, सचिन वाझे यांनी या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी औपचारिक विनंती केली आहे.
मात्र, वाझे यांनी सरकारी साक्षीदार होण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या जीवाला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापासून गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा दावाही अ‍ॅड. ओझा यांनी केला आहे. त्यामुळे वाझे यांच्या कथित साक्षीदार होण्याच्या भूमिकेमुळे या प्रकरणातील तपासाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिशा सालियान प्रकरणात सचिन वाझे यांच्या भूमिकेबाबत सुरुवातीपासूनच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तपासावर दबाव आणणे, पुरावे बदलणे तसेच दिशाच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार केल्यासारखे गंभीर आरोप सतीश सालियान यांनी वाझे यांच्यावर केले आहेत. दिशाला तिच्या राहत्या घरी नेण्यासाठी वाझे यांच्या मालकीच्या मर्सिडीज कारचा वापर झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्या काळातील वाझे यांचे कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन तपासण्यात यावे, अशी मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे.दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके आढळणे आणि त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अशा परिस्थितीत दिशा सालियान प्रकरणात ते अधिकृतपणे सरकारी साक्षीदार झाल्यास या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती तपास यंत्रणेसमोर येऊ शकते. मात्र, वाझे यांच्या माफीच्या साक्षीदार होण्याबाबतचे वृत्त सध्या वकिलांनी केलेल्या दाव्यांवर आधारित असून, त्यावर कोणताही अंतिम न्यायालयीन निष्कर्ष झालेला नाही.
दिशा सालियानच्या मृत्यूवरून disha salian death case  महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वीही मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी या प्रकरणावरून ठाकरे गटावर सातत्याने आरोप केले आहेत. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात आपली भूमिका मांडताना सालियान कुटुंबाच्या दुःखाबद्दल सहानुभूती व्यक्त केली. मात्र, राजकीय द्वेषातून आदित्य ठाकरे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांना या प्रकरणात विनाकारण ओढले जात असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला.
उच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. सचिन वाझे खरोखरच माफीचा साक्षीदार होणार का, झाल्यास सीबीआयसमोर ते नेमका कोणता जबाब नोंदवणार आणि त्यांच्या कथित माहितीमुळे तपासाची दिशा काय बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आधीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आगामी काळात कोणते नवे दावे किंवा खुलासे समोर येतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.