गोंदिया
farmers-protest gondia गुदमा-प्रतापबाग या नवीन रेल्वे मार्गासाठी संपादित केल्या जाणार्या जमिनींना अत्यंत कमी मोबदला देणे आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात ‘किसान जमीन बचाओ संघर्ष समिती’च्यावतीने सोमवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील बालाघाट मार्गावरील कटंगी नाका येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांना जोडणारा मुख्य मार्ग रोखून धरला.
दरम्यान, वाहतुक कोंडी होऊ नये याकरीता पोलिस प्रशासनाने बालाघाट टी पाँईटवरच वाहतूक अडवून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. मात्र, आंदोलनामुळे जड वाहनांना मुख्य मार्गावरच थांबावे लागल्याचे दिसून आले.
संघर्ष समितीच्यावतीने अखिलेश सेठ, प्रा. अमित बुद्धे, राजेश नागरीकर यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात परिसरातील कटंगी कला, नागरा, हलबीटोला, सावरी, गर्रा, गोंदिया खुर्द, पोवारीटोला, दतोरा, खमारी, चुलोद यासह १२ गावांतील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. भजन गायन करून आणि गळ्यात काळे गमच्छे घालून शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनस्थळी येत शेतकर्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आणि प्रशासनाची चर्चा निष्फळ ठरली. दरम्यान, शेतकर्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेत मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास व जमीनीचा योग्य मोबदला न मिळाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन उभारणार असा इशारा दिला आहे.