नवी दिल्ली,
Guyana's winning streak continues सीपीएल २०२६ मधील २८व्या सामन्यात गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सवर सात गडी राखून मात करत सलग सहावा विजय मिळवला. या विजयासह इम्रान ताहीरच्या नेतृत्वाखालील गयाना संघाने प्लेऑफचे तिकीट निश्चित केले. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत गयानाला अद्याप एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. गयानापूर्वी अँटिग्वा अँड बार्बुडा फाल्कन्सने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले होते.सेंट किट्सने प्रथम फलंदाजी करताना १९.२ षटकांत १२८ धावांत संपूर्ण संघ गमावला. ॲलिक अथानासेने ३९ चेंडूंत ५२ धावांची अर्धशतकी खेळी करत डावाला आकार दिला. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. काईल मेयर्स आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी २० धावा केल्या, तर जॉन्सन चार्ल्सने १५ चेंडूंत १३ धावांचे योगदान दिले.

गयानाच्या गोलंदाजीसमोर सेंट किट्सच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ४१ वर्षीय अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत केवळ १७ धावा देत चार फलंदाजांना बाद केले. रोमारियो शेफर्डने तीन विकेट्स घेतल्या, तर शमर जोसेफला दोन बळी मिळाले. १२९ धावांचे लक्ष्यगयानाने १८.३ षटकांत तीन गडी गमावून पार केले. रहमानुल्ला गुरबाजने २५ चेंडूंत ३९ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मावेंदर दिंदयालने १७ धावांचे योगदान दिले. मात्र, शिमरॉन हेटमायरला या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही आणि तो अवघ्या एका धावेवर बाद झाला.शाई होपने ४४ चेंडूंत ३८ धावांची संयमी खेळी करत शेवटपर्यंत नाबाद राहत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला मोहम्मद नबीची चांगली साथ मिळाली. नबीने २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या. सेंट किट्सकडून नवीन बिदैसीने दोन विकेट्स घेतल्या, तर वानिंदू हसरंगाला एक बळी मिळाला. अखेर गयानाने सात गडी राखून सामना जिंकत आपली विजयी मालिका कायम ठेवली.