भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार?

आशिया कपमध्ये समीकरणे काय सांगतात

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India and Pakistan to clash again आशिया कप २०२६ मध्ये भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने जिंकत ६ गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे, श्रीलंकेनेही गट ‘ब’मधील आपले तिन्ही सामने जिंकून अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सामना पाहायला मिळणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.गट ‘अ’मध्ये पाकिस्तानने दोन सामने खेळले असून त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात २ गुण आहेत आणि ते सध्या दुसऱ्या स्थानावर आहेत. थायलंडने तीन सामन्यांतून एक विजय मिळवत २ गुण मिळवले आहेत.
 
 
India and Pakistan to clash again
 
 
पाकिस्तानचा साखळी फेरीतील अखेरचा सामना हाँगकाँग चायनाविरुद्ध होणार आहे. हा सामना पाकिस्तानने जिंकल्यास त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल. मात्र पराभव झाल्यास थायलंड, पाकिस्तान आणि हाँगकाँग चायना यांच्यातील नेट रनरेटच्या आधारे पुढील संघ ठरवला जाईल. हाँगकाँगने आतापर्यंत दोन सामने खेळले असून त्यांना एकही विजय मिळालेला नाही.गट ‘ब’मध्ये श्रीलंकेने तिन्ही सामने जिंकून आपले स्थान पक्के केले आहे. या गटात बांगलादेश आणि यूएईच्या खात्यात प्रत्येकी २ गुण आहेत, तर इंडोनेशियाला अद्याप एकही गुण मिळालेला नाही. बांगलादेशला आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. त्यामुळे गट ‘ब’मधील दुसरा संघ कोणता असेल, याचे चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.उपांत्य फेरीचे समीकरण पाहता, गट ‘अ’मध्ये अव्वल ठरणारा संघ गट ‘ब’मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी खेळणार आहे. त्याचप्रमाणे गट ‘ब’मधील अव्वल संघाचा सामना गट ‘अ’मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.
 
सध्याच्या समीकरणानुसार भारताची उपांत्य फेरीत बांगलादेशशी, तर श्रीलंकेची पाकिस्तानशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट उपांत्य फेरीचा सामना होणार नाही. मात्र, भारत-पाकिस्तान सामना पूर्णपणे अशक्य नाही. पाकिस्तानने आधी हाँगकाँग चायनाविरुद्धचा अखेरचा साखळी सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करणे आवश्यक आहे. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही पाकिस्तानला विजय मिळवावा लागेल. दुसरीकडे, भारताने आपला उपांत्य सामना जिंकल्यास अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे आशिया कपमधील उर्वरित सामन्यांनंतरच या बहुप्रतीक्षित लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.