केळझर
keljhar-cement-work केळझर येथील बायपास ते बुद्ध विहार मार्गावरील सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या दर्जाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी यापूर्वीच आक्षेप घेतले असताना आता सिमेंटचे काम झाल्यानंतर त्यावर पाणी मारण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सिमेंटच्या बांधकामाला आवश्यक मजबुती मिळणार कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, येथे पाण्याची कोणतीही व्यवस्था नसून पावसाच्या पाण्यावरच भिस्त असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सिमेंटच्या बांधकामाला मजबुती मिळण्यासाठी त्यावर ठराविक कालावधीपर्यंत योग्य पद्धतीने पाणी देणे आवश्यक असते. मात्र, या ठिकाणी टँकर, पाईप किंवा अन्य कोणतीही व्यवस्था दिसत नसल्याने बांधकामाच्या टिकाऊपणाबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. तसेच नालीच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्यांमध्ये मुरमाऐवजी मातीचा भराव केला जात असल्याचे ग्रामस्थांचा आरोप आहे.
या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी झाल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी पाहणीसाठी घटनास्थळी आले होते. अधिकारी येताच कामगार निघून गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. मात्र, अधिकारी निघून गेल्यानंतर काही वेळातच तेच कामगार पुन्हा येऊन काम सुरू करू लागल्याने चर्चेला उधाण आले होते. आता सिमेंटच्या कामावर पाणी न मारणे आणि साईड पट्ट्यांमध्ये मातीचा भराव करणे या बाबी समोर आल्याने कामाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे.
जि.प.चे माजी सदस्य विनोद लाखे, ग्रा.पं.चे माजी सदस्य फारुख शेख, प्रवीण गायकवाड, सुनील कावलकर, डॉ. अशोक दोडके, बबलू सय्यद, सुधाकर मेश्राम, सुधाकर बोरधरे आणि सयजाद शेख यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संबंधित विभागाने केवळ पंचनामा करून न थांबता सिमेंट बांधकामाची गुणवत्ता, पाणी देण्याची व्यवस्था, वापरलेले साहित्य आणि साईड पट्ट्यांतील भरावाची तपासणी करावी. दोष आढळल्यास संबंधित ठेकेदार तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.