मुंबई
kunal kamra स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याची सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. मुंबईतील आगामी शोच्या पार्श्वभूमीवर कुणालने पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना सवाल केला आहे. ‘मी मुंबईत पुन्हा शो करू शकतो का?’ असा थेट प्रश्न त्याने उपस्थित केला असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कुणालने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ‘जे लोक मला सतत विचारतात की मी मुंबईत पुढचा कार्यक्रम कधी करणार आहे, त्यांना सांगू इच्छितो की हाच प्रश्न मला देखील @Mumbai Police (मुंबई पोलिसांना) विचारायचा आहे. मनोरंजनाच्या या राजधानीत मी माझा ‘स्टँड-अप’ कार्यक्रम कधी करू शकेन?’
यानंतर कुणालने आपल्या आधीच्या कामांमुळे प्रशासकीय पातळीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा उल्लेख करत मुंबई पोलिसांच्या जबाबदाऱ्यांवर उपरोधिक भाष्य केलं आहे. ‘मला याची जाणीव आहे की माझ्या आधीच्या कामांमुळे गेल्या काही वर्षांत प्रशासकीय पातळीवर काहीशी खळबळ उडाली आहे. तसेच, मुंबई पोलिसांवर अनेक महत्त्वाची जबाबदारी आहे हेही मी मान्य करतो. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे, वाहतूक व्यवस्थापन, ‘इंडियाज गॉट लेटंट’ पाहणे आणि अधूनमधून एखाद्या बंदिस्त खोलीत मला विनोद सांगण्याची परवानगी द्यायची की नाही हे ठरवणे, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत,’ असा टोला त्याने लगावला आहे.
आपला नियोजित कार्यक्रम शांततेत आणि नियमांचे पालन करूनच पार पडणार असल्याचंही कुणालने स्पष्ट केलं आहे. ‘माझा नियोजित कार्यक्रम नेहमीप्रमाणे शांततेत, बंदिस्त जागेत, संमती असलेल्या 100 प्रौढ प्रेक्षकांच्या उपस्थितीत आणि सर्व लागू कायदे व नियमांचे पालन करूनच पार पडेल,’ असं त्याने म्हटलं आहे.
मात्र, कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या जमावाच्या भूमिकेवर कुणालने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘जर 40-50 विनोद न समजणारे किंवा विनोदाची समज नसलेले लोक कार्यक्रम रद्द करण्यासाठी, त्यात व्यत्यय आणण्यासाठी किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणाचं नुकसान करण्यासाठी आले, तर तुम्ही त्या उपद्रवी लोकांना त्यांचा ‘व्हेटो’ वापरू द्याल का?’ असा सवाल त्याने केला आहे.
ज्यांनी कार्यक्रम पाहण्यासाठी तिकीटही घेतलेलं नाही, अशा लोकांचा जमाव ‘स्वातंत्र्य’ कशाला म्हणायचं हे ठरवणार का, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. अखेरीस कुणालने या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू एका प्रश्नात मांडला आहे. ‘खरं तर, प्रश्न फक्त एकाच गोष्टीचा आहे. तुम्ही जमावाच्या बाजूने आहात की कायद्याच्या?’ असा थेट सवाल त्याने मुंबई पोलिसांना केला आहे.
कुणाल कामराच्या या पोस्टमुळे मुंबईतील त्याच्या आगामी शोचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, सोशल मीडियावर त्याच्या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्याची ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.