ऐन सण-वारात गरिबांच्या पोटावर हातोडा

पहिल्या दिवशी बजाज चौकातील रस्ता मोकळा

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
वर्धा
encroachments-wardha शहरातील मुख्य रस्ते आणि प्रमुख चौकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या अतिक्रमणावर प्रशासनाने बुलडोजर चालवला. या अतिक्रमणामुळे शहरात दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन अपघातांचे प्रमाण वाढले होते. दरम्यान, नगरपालिका, पोलिस विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुतपणे सोमवार ७ रोजी पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. असे असले तरी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविल्याने ऐन सणावारात गरिबांच्या पोटावरच हातोडा टाकल्याच्या प्रतिक्रीया उमटत होत्या.
 
wardha
 
प्रशासनाच्या वतीने शहरात सलग तीन दिवस दवंडी देऊन सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांना आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, ज्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केले, त्यांच्यावर सोमवारी सकाळी पहिल्याच दिवसापासून कारवाई करण्यात आली. जवळपास ३० ते ३५ दुकानदारांचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले.
 
सोमवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाने शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि मुख्य केंद्रबिंदू असलेल्या बजाज चौक परिसरात धडक कारवाई केली. रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत फलक, टपर्‍या, हातगाड्या आणि दुकानांबाहेर काढलेले ओटे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले. कारवाई सुरू होताच अतिक्रमण धारकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही व्यापार्‍यांनी स्वतःहून आपले साहित्य हटवण्यास सुरवात केली. पहिल्या दिवसाच्या कारवाईमुळे बजाज चौकातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहतूक सुरळीत झाली आहे. अतिक्रमण काढताना नगरपालिकेचे कर्मचारी, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
१० दिवस चालणार मोहीम
शहरातील वाहतुकीचा अडथळा पूर्णपणे दूर करण्यासाठी ही अतिक्रमण हटाव मोहीम पुढील १० दिवस चालणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. शहरातील इतर प्रमुख मार्ग आणि अंतर्गत चौकांमध्येही ही कारवाई केली जाईल. यापुढे रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने दिला आहे.