बळीराजा चिंतेत... मराठवाड्यासह राज्यावर दुष्काळाचे सावट

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
मुंबई

maharashtra weather मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांकडे यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके करपली असून पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्याच्या इतर भागांतही पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत परतीच्या पावसापूर्वी सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस साथ देणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी सप्टेंबरमधील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
 

maharashtra weather september rain likely below average, marathwada farmers face drought concerns 
सप्टेंबर महिन्यात यंदाच्या सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आधीच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत मराठवाड्यातील उत्तर आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, या महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास त्याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून जमीन ओलीत ठेवावी आणि पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. पावसाच्या या मोठ्या खंडाचा शेतीला मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही उभा राहिला आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडूनही तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांत विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ओडिशाच्या दिशेने निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून दक्षिण गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रादरम्यान वाऱ्याची द्रोणीय रेषाही तयार झाली आहे. या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे २ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यभरात विविध भागांत पावसाची शक्यता असून सध्या अनेक भाग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या भागांत अपेक्षित पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. विशेषतः रब्बी हंगामासाठी जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध पाणीसाठा फायदेशीर ठरणार असून पिण्याचे पाणी तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागू शकतो. मात्र, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने पुढील काळात शेतकऱ्यांना पावसाच्या प्रत्येक सरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.