पावसाची जोरदार एन्ट्री; विदर्भासह घाटमाथ्यावर यलो अलर्ट

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
मुंबई
maharashtra weather update एल निनोच्या प्रभावामुळे संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचं समोर आलं. मात्र, आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचं पुनरागमन होण्याची शक्यता असून, गणरायाच्या आगमनापूर्वी राज्यात पावसाची जोरदार एन्ट्री होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
 

maharashtra weather update rain returns before ganeshotsav, yellow alert for vidarbha and ghat areas 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, घाटमाथा परिसरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह परिसरातही आज पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. पनवेल, पालघर आणि ठाणे परिसरात कमाल तापमान सुमारे 31 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या भागांत काही ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.
कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांना पावसाचा सामना करावा लागू शकतो.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. या भागात पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथ्यावरील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस, तसेच मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता कायम आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचंही लक्ष हवामानाच्या पुढील स्थितीकडे लागलं आहे.