मुंबई
manoj jarange patil मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यांनी पाणी घेण्यासह वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता वाढली असून, अंतरवलीत त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली आहे.
जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे त्यांची भेट घेण्यासाठी अंतरवलीत दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, उपोषण सोडावं, अशी विनंतीही दानवे यांनी त्यांना केली.
जरांगे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी वैद्यकीय पथक अंतरवलीत ठाण मांडून आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांसह त्यांची टीम जरांगे यांना उपचार घेण्याचा आग्रह करत आहे. मात्र, जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती सध्या अधिक खालावली असून, सोमवारी सायंकाळीही त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं.मराठा आंदोलक अशोक काळकुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे यांची प्रकृती खालावली असली तरी ते उपचार घेण्यास तयार नाहीत. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर अंतरवलीत मराठा समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
‘मागण्या तातडीने मान्य करा’
अंबादास दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलं. “जरांगे यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, त्या मागण्या ताबडतोब मान्य करण्याची गरज आहे. मी सर्वांशी चर्चा केली आहे. सरकारने याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्वरेने मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विस्फोट होऊ शकतो आणि त्याला जबाबदार कोण आहे, हे सांगायची गरज नाही,” असा इशारा दानवे यांनी दिला.
मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला. काही जणांची प्रमाणपत्रं रद्द झाल्याचं सांगत, हे जाणीवपूर्वक होत आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘मला पुरावे देण्याची गरज काय?’
यावेळी अंबादास दानवे यांनी सरकारला काही सवालही केले. “हैद्राबाद गॅझेटचं काय झालं? 55 लाख नोंदी करण्यात आल्या आहेत, तर मग प्रमाणपत्र दिलं का? माझ्या आजोबांच्या गॅझेटमध्ये कुणबी म्हणून नोंद असेल तर मला पुरावे देण्याची काय गरज आहे?” असा सवाल त्यांनी केला.
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळताच राज्यातील विविध भागांतून मराठा समाजातील नागरिक अंतरवलीकडे येऊ लागले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून लोक अंतरवलीत दाखल होत असून, ते जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, त्यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पुढील भूमिका काय घेतली जाते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.