जालना
manoj jarange patil मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली असून, मध्यंतरी त्यांना सलाईनही लावण्यात आली होती. जरांगे यांच्या प्रकृतीबाबत मराठा आंदोलकांमध्ये अस्वस्थता वाढत असतानाच राज्य सरकारच्या पातळीवर महत्त्वाच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने चार महत्त्वाचे निर्णय घेत चार स्वतंत्र शासकीय आदेश (जीआर/पत्रे) जारी केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयांमुळे मराठा, कुणबी तसेच SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) राज्यातील सर्व विभागीय कार्यालये आणि विद्यापीठांना निर्देश देत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास वर्ग अर्थात OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ तातडीने लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात OBC प्रवर्गाप्रमाणे सवलती उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सारथी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या धोरणातही महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे. नियोजन विभागाने सामाजिक न्याय विभागाच्या धोरणानुसार या शिष्यवृत्तीमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार परदेशी विद्यापीठांची शिक्षण फी थेट संबंधित संस्थेला अदा केली जाणार असून, त्यामुळे लाभाच्या रकमेवरील कमाल मर्यादा हटविण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना दरवर्षी १५०० यूएस डॉलर अतिरिक्त निर्वाह अथवा आकस्मिक भत्ता देण्यात येणार आहे. यूकेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम दरवर्षी ११०० जीबीपी इतकी असेल. तसेच QS Ranking च्या आधारे नवीन गुणवत्ता यादीची कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
रोजगाराच्या दृष्टीनेही सारथी संस्थेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सारथी, पुणे यांनी IDTRS पिंपरी-चिंचवड यांच्याशी सामंजस्य करार करून १,४४० मराठा आणि कुणबी तरुणांसाठी LMV, HMV ड्रायव्हिंग तसेच कंडक्टर प्रशिक्षणाचा कार्यारंभ आदेश जारी केला आहे. हे प्रशिक्षण १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणातून किमान १,००० लाभार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या चार निर्णयांसोबतच manoj jarange patil कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटिअरनुसार प्राप्त झालेल्या नोंदी गावपातळीवर उपलब्ध करून देण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे. या संदर्भात आढावा बैठका सुरू असून, राधाकृष्ण विखे पाटील मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील अधिकारी तसेच विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेत आहेत.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुणबी नोंदी मोबाईलवर पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या गावांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्या संबंधित गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावपातळीवर लावण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
गावपातळीवर सर्व ठिकाणी उपलब्ध झालेल्या नोंदी लावण्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर संबंधित नोंदी उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून एकीकडे शैक्षणिक, आर्थिक आणि रोजगारविषयक निर्णय जाहीर होत असताना दुसरीकडे कुणबी नोंदी गावपातळीवर उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेलाही गती दिली जात असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.