मुंबई
mpsc महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक अर्थात ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणाचा तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या हाती तब्बल २७० पानांचे WhatsApp चॅट लागले असून, या डिजिटल पुराव्यांमधून कथित पेपर लीक रॅकेटचे धागेदोरे समोर येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील आणि तिचा प्रियकर तथा सहआरोपी लोकेश उर्फ गौरव पाटील यांच्यातील संभाषणाचा डेटा पोलिसांना मिळाला आहे. गुन्हा उघडकीस आल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ऋतुजा पाटील हिने आपला मोबाईल उल्हास नदीत फेकून दिल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. संबंधित मोबाईलचा शोध अद्याप सुरू आहे. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गौरव पाटीलच्या मोबाईलमधील WhatsApp डेटा रिकव्हर करण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे. या २७० पानी संभाषणातून परीक्षा पेपर लीक प्रकरणातील अनेक महत्त्वाचे तपशील समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी झालेल्या परीक्षेपूर्वी आरोपींमध्ये झालेल्या संभाषणात प्रश्नपत्रिकेशी संबंधित महत्त्वाचे उल्लेख आढळले आहेत. २० मार्च रोजी ऋतुजा हिने गौरवसोबतच्या चॅटमध्ये एका प्रश्नसंचातील काही विशिष्ट प्रश्न थेट परीक्षेत येणार असल्याचा दावा केल्याचे तपासात समोर आले आहे. संशय येऊ नये म्हणून परीक्षेत जाणीवपूर्वक १० प्रश्न चुकीचे सोडवण्याची योजना आखण्यात आल्याचाही उल्लेख या संभाषणात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
परीक्षेच्या दिवशी mpsc म्हणजेच २२ मार्च रोजी झालेल्या संभाषणातून आणखी धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा केला जात आहे. ऋतुजा हिने दिलेल्या प्रश्नांपैकी तब्बल ७८ प्रश्न मुख्य प्रश्नपत्रिकेत हुबेहूब आले होते. याशिवाय आणखी १३ प्रश्नही आधीच मॅनेज करण्यात आल्याचा उल्लेख चॅटमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकूण १०० पैकी तब्बल ९१ प्रश्नांची आधीच जुळवाजुळव करण्यात आली होती, असा तपास यंत्रणेचा दावा आहे.
या प्रकरणात केवळ प्रश्नपत्रिकेची देवाणघेवाणच नव्हे, तर मोठ्या आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख WhatsApp चॅटमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या कथित गैरव्यवहारात मयूर ठाकरे याचा थेट संबंध असल्याचे चॅटमधून स्पष्ट होत असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. मयूर ठाकरे सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर कशी पोहोचली, या संपूर्ण प्रकारात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील किंवा प्रश्नपत्रिका छपाईच्या प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींचा सहभाग अथवा संगनमत होते का, तसेच प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. WhatsApp चॅटसह अन्य डिजिटल फॉरेन्सिक पुराव्यांची कसून तपासणी केली जात आहे.या प्रकरणातील २७० पानी WhatsApp संभाषण तपासासाठी महत्त्वाचा डिजिटल पुरावा ठरला असून, त्यातून कथित पेपर लीक प्रकरणातील आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिकेची देवाणघेवाण आणि आरोपींमधील समन्वयाबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळत असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे MPSCच्या औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणाचा तपास आता नेमक्या कोणत्या दिशेने जातो आणि आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.