इडा-पिडा घेऊन जाण्यासाठी ‘मारबत’ जज्ज

१४५ वर्षांच्या परंपरेला प्रारंभ

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
पराग मगर 
नागपूर,
nagpur marbat festival नागपूरची सांस्कृतिक ओळख आणि १४५ वर्षांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेल्या मारबत महोत्सवाला जन्माष्टमीपासून प्रारंभ झाला. पाचपावली परिसरात तऱ्हाने तेली समाजाच्या वतीने पिवळ्या मारबतीची स्थापना करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पोळ्याच्या पाडव्याला इतवारीतील नेहरू पुतळा परिसरात काळी आणि पिवळी मारबत भेटीचा ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे.
 

इडा-पिडा घेऊन जाण्यासाठी ‘मारबत’ जज्ज   १४५ वर्षांच्या परंपरेला प्रारंभ   पाचपावलीत पिवळी तर इतवारीत काळ्या मारबतीची स्थापना  nagpur marbat festival 2026: 145-year-old tradition begins with yellow and black marbat      नागपूर,  nagpur marbat festival नागपूरची सांस्कृतिक ओळख आणि १४५ वर्षांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेल्या मारबत महोत्सवाला जन्माष्टमीपासून प्रारंभ झाला. पाचपावली परिसरात तऱ्हाने तेली समाजाच्या वतीने पिवळ्या मारबतीची स्थापना करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पोळ्याच्या पा 
 
 
इडा-पिडा, रोगराई आणि संकटे दूर करून नागपूरकरांचे रक्षण करणारी देवीस्वरूप मारबत अशी लोकभावना आहे. इतिहास संशोधक निकिता रामानी यांच्या मते, पोळ्याच्या पाडव्याला नागपूरसह विदर्भातील अनेक भागांत पळसाच्या पानांचे मेढे तयार करून ‘इडा-पिडा घेऊन जा गे मारबत’ असे म्हणत ते दहन करण्याची प्राचीन प्रथा आहे. एकेकाळी इतवारी आणि बुधवारी परिसरात याच काळात काॅलरा पसरला होता. त्याला ‘काळा ताप’ संबाेधले जायचे. हा आजार जाण्यासाठी समाजाच्या वतीने प्रतिकात्मक काळी मारबत तयार करून ती नागपूरची वेस असलेल्या हरिहर मंदिरापाशी जाळली. तेव्हापासून काळी मारबत काढण्याची प्रथा रूढ झाली.
 
 
बाकाबाईच्या रूपातील पिवळ्या मारबतीची परंपरा
दुसरे रघुजीराजे भोसले यांच्या पत्नी बाकाबाई या प्रजेचे हित जपणाऱ्या आणि भोसले घराण्याचे राज्य खंबीरपणे सांभाळणाऱ्या राणी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनानंतर नागरिक त्यांना देवीस्वरूप मानत असल्याचे सांगितले जाते. एकदा या परिसरात पीलियाची साथ पसरल्यानंतर तऱ्हाने समाजाने बाकाबाईंच्या प्रतिकात्मक स्वरूपात पिवळी मारबत तयार करून तिची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. रोगराई घेऊन जाणाऱ्या देवीस्वरूप मारबतीची ही परंपरा पुढे अधिक व्यापक झाली आणि काळी-पिवळी मारबत नागपूरच्या वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरेचे प्रतीक बनली.
 
 

गणेशोत्सवापेक्षाही प्राचीन परंपरा
 
 
ब्रिटिश राजवटीच्या काळात नागरिकांना एकत्र येण्यावर निर्बंध असले तरी धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुलनेने हस्तक्षेप कमी होता. या पार्श्वभूमीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांचा प्रचार सुरू केला. मात्र, नागपुरात लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने त्यापूर्वीच, म्हणजे १८८५ पासून मारबत उत्सवाची परंपरा सुरू झाल्याचे निकिता रामानी सांगतात. त्यामुळे नागपूरचा मारबत उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षाही प्राचीन असल्याचा दावा केला जात आहे.
बाकाबाई ही ‘काळी मारबत’ हा संदर्भ चुकीचा
 
 
बाकाबाईंनी इंग्रजांशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांना पुतना स्वरूपातील काळी मारबत म्हणून हेटाळणी करण्याची प्रथा काही काळ प्रचलित झाली होती. मात्र, हा ऐतिहासिक संदर्भ चुकीचा असल्याचे निकिता रामानी यांनी स्पष्ट केले. अनेक संस्थाने खालसा झाल्यानंतर राजघराण्यांच्या वंशजांची परिस्थिती बिकट झाली; मात्र नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज आजही सुस्थितीत आहेत. याचे मोठे श्रेय बाकाबाईंच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल, असे रामानी सांगतात.

‘मारबत उत्सव आधीपासूनच आंतरराष्ट्रीय’
 
 
यंदा नागपूर महानगरपालिकेने मारबत उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, इतक्या वर्षांनंतर हा प्रयत्न का होत आहे, असा सवाल मारबत महोत्सवाचे आयोजक जयवंत तकीतकर यांनी उपस्थित केला आहे. “१४५ वर्षांची परंपरा असलेल्या मारबत उत्सवाने आधीच देश-विदेशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. या परंपरेवर अनेकांनी संशोधन केले आहे. त्यामुळे उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे श्रेय केवळ महानगरपालिकेने घेण्याचा प्रयत्न करू नये,” अशी भूमिका त्यांनी मांडली.