रेल्वे भरतीत बोगस उमेदवार मैदानात

चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल : अन्य उमेदवारांच्या नावावर देत होते परीक्षा

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur railway रेल्वेत नोकरी मिळविण्यासाठी काही उमेदवारांनी वाम मार्गाचा वापर केल्याचे आढळून आले असून मध्य रेल्वेच्या रेल्वे भरती कक्षामार्फत (आरआरसी) घेण्यात येत असलेल्या ग्रुप ‘डी’ पदाच्या शारीरिक पात्रता चाचणीत (पीईटी) डमी उमेदवार हजर झाल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बनवेगिरी करणाऱ्या चार जणांविरुद्ध अजनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
 

nagpur railway recruitment scam: dummy candidates caught in group d pet, four booked 
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अजनी रेल्वे स्टेडियम मैदानावर मध्य रेल्वेच्या ग्रुप ‘डी’ पदांसाठी शारीरिक पात्रता चाचणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान रेल्वे भरती कक्षाचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्रकुमार हिरालाल परदेशी (५८, रा. मुंबई) यांच्या देखरेखीखाली उमेदवारांची कागदपत्रे आणि ओळख पडताळणी सुरू होती. १ जून ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या तपासणीत आग्रा (उत्तर प्रदेश) येथील बागदा येथील मूळ उमेदवार अंकित रामदास तिवारी (२१) याच्या जागी शिकोहाबाद (उत्तर प्रदेश) येथील आरोपी शिवम हरिकिशन यादव (२६) याने स्वतःला अंकित तिवारी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे चाचणी दिली. त्याचप्रमाणे, राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील बैजूपारा येथील मूळ उमेदवार बुधराम श्रीराम मीना (२७) याच्या नावावर बिरगाव, दौसा येथील आरोपी राहुलकुमार शिवलाल मीना (३६) याने बनावट ओळखपत्र आणि कागदपत्रांच्या आधारे शारीरिक चाचणी दिली. चारही आरोपींनी संगनमत करून बनावट ओळखपत्रे आणि कागदपत्रांच्या आधारे रेल्वे प्रशासनाची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले. रेल्वे अधिकारी परदेशी यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.