पाकिस्तानची PSL आता जानेवारीत?

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistan's PSL now in January पाकिस्तान सुपर लीगच्या २०२७च्या हंगामाच्या आयोजनाच्या वेळेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून एप्रिल-मे महिन्यात होत असलेली ही स्पर्धा आता जानेवारीत घेण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून विचार सुरू आहे. पीएसएलचे वेळापत्रक बदलण्यामागे इंडियन प्रीमियर लीगशी होणारा संघर्ष हे प्रमुख कारण नसल्याचे समोर आले आहे.ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि पीएसएलमधील सर्व आठ फ्रँचायझींच्या मालकांची बैठक झाली. या बैठकीत लीग जानेवारीत आयोजित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पीएसएलच्या मीडिया हक्कांचे मालक असलेल्या ‘वली टेक्नॉलॉजी’ने जानेवारीत स्पर्धा घेण्याची कल्पना मांडल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीकडे २०२९ पर्यंत पीएसएलचे मीडिया हक्क आहेत.
 
 
 
psi
 
एप्रिल-मे महिन्यात पीएसएल आयोजित केल्यास व्यावसायिक पातळीवर अडचणी येत असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. रमजाननंतर हा कालावधी येत असल्याने तोपर्यंत अनेक कंपन्या टीव्ही आणि जाहिरातींसाठीचे आपले बजेट आधीच खर्च करून टाकतात. त्यामुळे जानेवारीचा कालावधी स्पर्धेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो, असा विचार मांडण्यात आला आहे. यामुळे यंदाच्या वेळापत्रकात बदल करण्यामागे IPL पेक्षा व्यावसायिक कारणांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे दिसते.मात्र, जानेवारीमध्ये पीएसएल घेण्याचा निर्णय झाल्यास पाकिस्तान बोर्डासमोर काही मोठी आव्हानेही असतील. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेचा आहे.
 
 
जानेवारीत ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग आणि दक्षिण आफ्रिकेची SA20 स्पर्धा सुरू असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पीएसएलसाठी उपलब्ध करून घेणे पाकिस्तान बोर्डासाठी कठीण ठरू शकते. त्याचबरोबर पंजाबसह पाकिस्तानच्या काही भागांमध्ये जानेवारीतील कडाक्याची थंडी हा देखील महत्त्वाचा मुद्दा असेल. पीएसएलच्या पहिल्या नऊ हंगामांचे आयोजन फेब्रुवारी-मार्चदरम्यान करण्यात आले होते. मात्र, २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६च्या टी२० विश्वचषकामुळे स्पर्धा एप्रिल-मे महिन्यात हलवण्यात आली. परिणामी, तिची तारीख IPLशी जुळली आणि दोन्ही लीगमध्ये संघर्ष निर्माण झाला. या काळात काही परदेशी खेळाडूंनी पीएसएलऐवजी IPLमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचा मार्ग स्वीकारला होता.