मियामी,
Plane catches fire in Miami अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲमेझॉनच्या मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला. सॅन जुआन, प्युर्टो रिको येथून येणारे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टी ओलांडून पुढे गेले आणि अनेक वाहनांना धडकले. त्यानंतर विमानाला आग लागली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अन्य २ जणांना किरकोळ दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे २ वाजता घडली. विमान वाहनांना धडकल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मियामी-डेड फायर रेस्क्यूची ६० हून अधिक पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये काही जण अडकले होते, तर विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट आणि को-पायलटही अडकून पडले होते. बचाव पथकांनी दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढले. एका व्यक्तीच्या वाहनाखाली अडकल्याची माहितीही बचाव संस्थेकडून देण्यात आली.

अपघातानंतर बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. विमानातून इंधनाची गळती होत असल्याने अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासोबतच इंधनगळतीचाही सामना करावा लागला. मृत्यू झालेल्या पाच व्यक्ती विमानातील होत्या की विमानाच्या धडकेत सापडलेल्या वाहनांमधील होत्या, हे तत्काळ स्पष्ट करणे घाईचे ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मियामी-डेड रेस्क्यू फायरचे प्रमुख रे जडालाह यांच्या नेतृत्वाखाली आपत्कालीन पथकांनी अनेक तास घटनास्थळी बचावकार्य सुरू ठेवले.घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये प्राइम एअरचे विमान दोन सेमी-ट्रकच्या जवळ रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत होते. आग लागल्यानंतरही विमानाचा मोठा भाग शाबूत असल्याचे दिसून आले. हे विमान नॉर्थ कॅरोलिना येथील मालवाहतूक कंपनी ‘21 एअर’कडून चालवले जात होते. अपघातग्रस्त बोईंग ७६७ विमान ३२ वर्षे जुने असून ते सुरुवातीला प्रवासी विमान म्हणून तयार करण्यात आले होते. फ्लाइटराडार२४च्या माहितीनुसार, २०१५ मध्ये या विमानाचे मालवाहू विमानात रूपांतर करण्यात आले. त्यापूर्वी दोन दशकांहून अधिक काळ या विमानाने विविध विमान कंपन्यांसाठी प्रवासी सेवा दिली होती. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण आणि दुर्घटनेमागील परिस्थितीचा तपास सुरू आहे.