नागपूर,
ramtek-crime-newsएका विधवा महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला रामटेक पोलिसांनी चंद्रपूर येथून अटक केली. अजय सदाशिव सलामे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून शनिवारी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा त्याला रामटेक येथे आणण्यात आले. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
रामटेक येथील एका विधवा महिलेने पोलिस कर्मचारी अजय सलामे याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून संबंधित महिलेसोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीचे अन्य एका महिलेसोबत संबंध असल्याची माहिती पीडितेला मिळाल्याने तिने त्याच्याशी संपर्क तोडला. यानंतर आरोपीने पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी महिलेवर दबाव टाकला आणि पिस्तूलचा धाक दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीच्या संपर्कातील एका महिला वकिलावरही पीडितेच्या मुलांना नुकसान पोहोचविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी अजय सलामेविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी अजय फरार झाला होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी त्याने अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न केले होते. दरम्यान, रामटेक पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी चंद्रपूर येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कारवाई करून त्याला अटक केली. या प्रकरणातील सहआरोपी महिला वकिलाला अंतरिम जामीन मिळाल्याची माहिती आहे.
पोलिस कर्मचारी निलंबित
हे प्रकरण दाखल झाल्यानंतर पोलीस विभागाने अजय सलामे याला निलंबित केले असून त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत. अजय सलामेच्या पत्नीनेही पीडित विधवेची न्याय मिळावा अशी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.