१२ हजार कर्मचाऱ्यांची भरती; २५० नव्या शाखा उभारण्याचे उद्दिष्ट

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
मुंबई
sbi बेकारीने त्रस्त असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये चालू आर्थिक वर्षात तब्बल ११ ते १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. याशिवाय याच आर्थिक वर्षात बँकेचे शाखांचे जाळे आणखी विस्तारण्याचे उद्दिष्ट असून सुमारे २५० नव्या शाखा उभारण्याची योजना आहे. SBIचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी ही माहिती दिली.
 

sbi recruitment 2026: state bank of india to hire 12,000 employees and open 250 new branches 
क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये मिळून चालू आर्थिक वर्षात ११ ते १२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे सी. एस. शेट्टी यांनी सांगितले. निवृत्त होणारे कर्मचारी आणि नव्याने निर्माण होणाऱ्या मनुष्यबळाच्या गरजा लक्षात घेऊन भरतीची संख्या काही प्रमाणात बदलू शकते. मात्र, आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे १२ हजार नियुक्त्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा असल्याचे शेट्टी यांनी पीटीआयशी (PTI) बोलताना स्पष्ट केले.
गेल्या वर्षी SBIने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची भरती केली होती. त्यामध्ये तब्बल १,५०० स्पेशलिस्ट आयटी अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे यंदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती-तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची भरती करण्याची आवश्यकता नसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
मार्च २०२६ अखेर SBIच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २.४५ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे SBI ही भारतातील सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांपैकी एक ठरली आहे.
दरम्यान, बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये SBIने एकूण २५,६३३ कर्मचाऱ्यांची भरती केली. यामध्ये ४,६४० अधिकारी, १९,३४० सहायक अधिकारी आणि १,६५३ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
SBIच्या शाखा विस्ताराबाबतही सी. एस. शेट्टी यांनी महत्त्वाची माहिती दिली. बँकेचे देशभरात मोठे शाखा-जाळे असले, तरी काही ठिकाणी अद्याप कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची आवश्यकता आहे. नव्याने विकसित होणाऱ्या वसाहती तसेच व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय होत असलेल्या भागांमध्ये बँकेचा विस्तार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची भरती महत्त्वाची ठरणार आहे.
याचबरोबर SBI काही विद्यमान  sbi  शाखांचे रॅशनलायझेशन अर्थात पुनर्रचना करण्याचाही विचार करत आहे. या प्रक्रियेसह बँकेच्या कर्मचारी संख्येत दरवर्षी सुमारे २०० ते २५० कर्मचाऱ्यांची वाढ होईल, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात SBIच्या शाखा विस्तारासोबतच रोजगाराच्या संधीही वाढण्याची शक्यता आहे.