नगरसेविका विशाखा राऊत यांचे पद रद्द

सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी, राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
मुंबई
vishakha raut शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. जात पडताळणी प्रक्रियेत त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानंतर त्यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार होती. या निर्णयाला आव्हान देत विशाखा राऊत यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयातूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. अखेर मुंबई महापालिकेच्या सभेत महापौर रितू तावडे यांनी विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा केली.
 

shiv sena ubt leader vishakha raut disqualified as corporator, barred from elections for six years 
नगरसेवक पद गमावण्याबरोबरच विशाखा राऊत यांच्यावर पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
विशाखा राऊत दादरमधील प्रभाग क्रमांक १९१ मधून ओबीसी महिला राखीव जागेवर निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत त्यांच्यासमोर शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचे आव्हान होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत विशाखा राऊत यांनी अवघ्या १९७ मतांनी विजय मिळवला होता.
विशाखा राऊत यांना निवडणुकीत १३ हजार ३२६ मते मिळाली होती, तर प्रिया सरवणकर यांच्या पारड्यात १३ हजार ०३९ मते पडली होती. त्यामुळे केवळ १९७ मतांच्या फरकाने विशाखा राऊत विजयी झाल्या होत्या.
मात्र जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांमुळे त्यांच्या नगरसेवक पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जात पडताळणीत प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु न्यायालयाकडूनही दिलासा न मिळाल्याने त्यांचे नगरसेवक पद जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
अखेर मुंबई महापालिकेच्या सभेत महापौर रितू तावडे यांनी विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली. यासोबतच पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नसल्याने विशाखा राऊत यांच्या राजकीय भवित्यावर या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.