मिठाईवरील चांदीचा वर्ख आरोग्यासाठी धोकादायक!

मेंदू, मूत्रपिंड, यकृतावर होतो परिणाम

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
silver-vark-health-riskभारतीय मिठाईंवर लावला जाणारा चकाकणारा पातळ थर म्हणजेच ‘चांदीचा वर्ख’, हा अनेकदा पारंपरिक मिठाई आणि सण-उत्सवांशी जोडला जातो. मिठाईवर लावली जाणारी ‘फॉइल’ जरी शुद्ध चांदीची असली, तरी त्यात ‘ॲल्युमिनियम’सारख्या इतर धातूंची भेसळ असल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
 
silver
सर गंगा राम हॉस्पिटलमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. अनिल अरोरा यांच्या मते, दूषित फॉइलचे अधूनमधून सेवन केल्याने हानी होण्याची शक्यता कमी असते, परंतु जर त्या फॉइलमध्ये जड धातू असतील, तर दीर्घकाळापर्यंत त्याचे नियमित सेवन करणे धोकादायक ठरू शकते. अस्सल चांदीचा वर्ख हा अत्यंत शुद्ध चांदीपासून तयार केलेला असतो आणि तो साधारणपणे अतिशय पातळ थर असतो, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अन्नसुरक्षेचे निकष पूर्ण करण्यासाठी आणि मानवी वापरासाठी सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी शुद्ध चांदीपासून तयार केलेल्या फॉइलची आवश्यकता असते, असे त्यांनी सांगितले. मात्र, जेव्हा चांदीचा वर्ख म्हणून सादर केल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये ॲल्युमिनियम, आर्सेनिक किंवा कॅडमियम यांसारख्या धातूंची भेसळ असते, तेव्हा चिंता निर्माण होते.
 
दूषित फॉइलचे आवरण असलेल्या मिठाईचे सतत सेवन केल्यास ‘जड धातूंमुळे विषबाधा’ होऊ शकते, असे डॉ. अरोरा यांनी सांगितले. यामुळे मेंदू, मूत्रपिंड आणि यकृत यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. त्यांनी दूषित फॉइल एकदा-दोनदा खाल्ल्याने असे परिणाम होतीलच असे नाही. ही चिंता प्रामुख्याने दीर्घकालीन आणि वारंवार होणाऱ्या सेवनाशी संबंधित आहे. डॉ. अरोरा यांच्या मते, मिठाईवर लावला जाणारा वर्ख शुद्ध चांदीचा असू शकतो, ज्यामध्ये ९९.९ टक्के चांदी असू शकते. अन्नावर वापरण्यासाठी सहसा याचा अत्यंत पातळ थर तयार केला जातो. जेव्हा या फॉइलमध्ये इतर धातूंची भेसळ होते, तेव्हा ती चिंतेची बाब ठरते.