सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंबात 'पुन्हा सामना'

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
बारामती
someshwar sugar factory election बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीमुळे बारामतीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा कारभार सुरू होता. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरू आहे. आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढवण्याची घोषणा युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली आहे.
 

someshwar sugar factory election: yugendra pawar announces farmer panel, direct fight between pawar factions 
शेतकरी पॅनलच्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाविरोधात सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
युगेंद्र पवार यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि अजित पवार यांच्या कष्टामुळे सोमेश्वर कारखाना चांगल्या पद्धतीने चालला. अजित पवार यांचा कारखान्यावर प्रभावी वचक होता. कोणतेही गैरप्रकार आढळल्यास तातडीने कारवाई करून चौकशी केली जात होती. अजित पवार आता हयात नसले तरी शरद पवार यांनी कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी सभासदांची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.
शरद पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. माळेगाव कारखान्यात डिस्टिलरी बंद असल्यासारख्या अडचणी निर्माण झाल्याचा उल्लेख करत त्यांनी कारभारावर प्रश्न उपस्थित केले. एखाद्या कारखान्यावर प्रशासक नेमण्याची वेळ येत असेल, तर सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांची भूमिका काय, असा सवालही त्यांनी केला. संचालक मंडळावर प्रभावी वचक आणि योग्य देखरेख असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
शरद पवार यांना सहकार आणि साखर कारखानदारीचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्यासाठी शेतकरी पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पॅनलमध्ये उच्चशिक्षित, तरुण, ज्येष्ठ आणि अनुभवी उमेदवारांचा समावेश केला जाणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. स्वच्छ प्रतिमा असलेले तसेच सभासदांच्या प्रश्नांसाठी काम करणारे उमेदवार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
गेल्या १० ते १५ वर्षांपासून, तर काही ठिकाणी तब्बल ३० वर्षांपासून तेच लोक संचालकपदावर असल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला. त्यामुळे तरुण सभासदांना आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न शेतकरी पॅनलच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सभासद आणि कामगारांचे हित केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा दावा त्यांनी केला.
विद्यमान संचालक मंडळात बदल होणे गरजेचे असल्याचे मतही युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आगामी पंचवार्षिक निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता बारामतीच्या राजकारणातील पवार कुटुंबातील संघर्षाचे नवे मैदान ठरण्याची चिन्हे आहेत.