ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास, वाघीण अखेर जेरबंद

नवनीत राणा, आ. प्रवीण तायडे यांच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
अमरावती
tigress--captured-chandurbazar जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी व शिरजगाव कसबा परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर वनविभागाच्या पथकाने आज, सोमवारी दुपारी जेरबंद केले. गेल्या काही दिवसांत या वाघाने तीन निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. अखेर वनविभागाच्या अथक प्रयत्नांना यश आले असून वाघाला ट्रँक्युलाईज करून सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले आहे.
 
chandurbazar
 
सोनोरी गावातील १७ वर्षीय उर्मिला बाजीराव इवने हिच्यावर रविवारी तर सोमवारी शिरजगाव कसबा येथील दिनेश आवारे (वय ४५) यांच्यावर हल्ला करून वाघिणीने त्यांना ठार केले होते. या दोन्ही घटनांनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. नागरिकांचा आक्रोश आणि वाघिणीचा वाढता धोका लक्षात घेऊन वनविभागाने तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली होती. शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांनी शेतात जाणेही बंद केले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी तातडीने घटनास्थळी लक्ष केंद्रित केले. सकाळपासूनच त्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेत होत्या. त्यांनी मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्याशी सतत संपर्क साधून वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाकडून सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला.
नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन नवनीत राणा यांनी वनमंत्र्यांशीही थेट संपर्क साधत परिस्थितीची गंभीरता निदर्शनास आणून दिली. वाघाचा शोध घेण्यासाठी आणि नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्याची मागणी केली होती. आमदार प्रवीण तायडे त्यांच्यासोबत होते.
 
वाघिणीच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पुणे, नागपूर येथून आलेल्या विशेष शोधपथकाने मोर्चेबांधणी करून वाघिणीचा मागोवा घेतला. अखेर वनविभागाच्या पथकाला यश मिळाले. योग्य संधी साधून तिला ट्रँक्युलाईज करून जेरबंद केले. ही माहिती सोनोरी, शिरजगाव कसबासह परिसरातील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा व आमदार प्रवीण तायडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. वनविभागाने नागरिकांना अद्यापही सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, जंगलालगतच्या भागात तसेच शेतशिवारात जाताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.