अनिल कांबळे
नागपूर
facebook-friend-rape-case फेसबुकवर झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. महिला गर्भवती झाल्यानंतर लग्नास टाळाटाळ केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी मानकापूर येथील अक्षय अडकणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय पीडित महिलेचा २०१६ मध्ये विवाह झाला होता. मात्र, वैवाहिक जीवनात पतीसोबत सातत्याने वाद होत असल्याने अखेर २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर महिला आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून महिलेची अक्षय अडकणे याच्याशी ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये मैत्री वाढली. आरोपीने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो तिला हुडकेश्वरमधील पिपळा रोड परिसरातील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तेथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. काही दिवसांनी महिला गर्भवती झाल्याचे तिला समजले. तिने ही बाब अक्षयला सांगून लग्न करण्याबाबत विचारणा केली. मात्र, त्यानंतर आरोपीकडून लग्नाबाबत टाळाटाळ करण्यात येऊ लागल्याचा आरोप महिलेने केला आहे. अखेर महिलेने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय अडकणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ६९ तसेच बलात्कारासंदर्भातील कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलिस करीत आहेत.