डोडा.
Young woman jumps into the Chenab जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात एका तरुणीने प्रेम नगर पुलावरून चिनाब नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथकांकडून तरुणीचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप तिचा मृतदेह हाती लागलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, पायल देवी ही तरुणी तिचे वडील कृष्ण लाल यांना फोनवरून उद्देशून अखेरचे बोलल्याचे सांगण्यात येते. पायल जत्रेतून आपल्या गावातील एका ओळखीच्या व्यक्तीसोबत मोटरसायकलवरून परतत होती. त्यावेळी तिचा स्कार्फ मोटरसायकलमध्ये अडकल्याने चालकाने वाहन थांबवले. त्यानंतर पायल पुलाच्या कडेला गेली आणि तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे तेथे उपस्थित नागरिकांना सांगितले.

घटना लक्षात आल्यानंतर पुलावरील नागरिकांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मोटरसायकलस्वाराने तिच्या वडिलांनाही फोन करून परिस्थितीची माहिती दिली. कृष्ण लाल यांनी मुलीशी फोनवर संवाद साधत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर पायलने चिनाब नदीत उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस पथके आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चिनाब नदीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. पायल देवीचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून, बचाव पथकांकडून नदीत तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.