हिंगणघाट
birds-nests शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उपअभियंता कार्यालय परिसरातील ३९ झाडांवर वसलेल्या पाणपक्ष्यांच्या मिश्र विणवसाहतीची घरटी गणना रविवार ६ रोजी करण्यात आली. या गणनेत सहा प्रजातींची तब्बल ६४६ घरटी आढळून आली. विदर्भातील मोठ्या सारंगगारांपैकी (हेरोनरी) एक असलेल्या या वसाहतीत यंदा मोठ्या बगळ्यांचीही (ग्रेट इग्रेट) नोंद झाली आहे.
परिसरातील तसेच रस्त्यालगतच्या देशी बाभूळ, आंबा, खोटा अशोक, शिसव, करंज, वड, पिंपळ, कॅशिया सिमिया आणि गुलमोहर आदी झाडांवर पाणपक्ष्यांनी घरटी थाटली आहेत. या विणवसाहतीची प्रजातीनिहाय घरटी गणना निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र, वर्धा जिल्हा शाखेच्या संयुत वतीने करण्यात आली.
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या परिसरातील झाडांवर पाणपक्षी घरटी बांधण्यास सुरुवात करतात. या विणवसाहतीतील पक्ष्यांचे संरक्षण, त्यांच्या प्रजननाची स्थिती जाणून घेणे आणि प्रजातीनिहाय माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने घरटी गणना केली जाते. या वर्षीच्या पहिल्या टप्प्यातील गणना ७ जून रोजी करण्यात आली होती. त्यावेळी पाच प्रजातींची ४३८ घरटी नोंदविण्यात आली होती. त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी झालेल्या दुसर्या टप्प्यातील गणनेत सहा प्रजातींची ६४६ घरटी आढळली. यात गाय बगळा (कॅटल इग्रेट) १०७, छोटा बगळा (लिटील इग्रेट) ५६, छोटा पानकावळा (लिटील कॉर्मोरंट) २७, भारतीय पानकावळा (इंडिअन कॉर्मोरंट) १, रात ढोकरी (ब्लॅक-क्राउंड नाईट हेरॉन) ४०, मोठा बगळा (ग्रेट इग्रेट) ३, सक्रिय घरटी २३४, वापरलेली/निष्क्रिय घरटी ४१२ अशी ६४६ घरट्यांची नोंद घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात ४३८ आणि दुसर्या टप्प्यातील ६४६ अशी दोन्ही गणनांची एकत्रित नोंद पाहता यावर्षी या सारंगगारात १ हजार ८४ घरट्यांची नोंद झाली आहे.
दुसर्या टप्प्यातील गणनेदरम्यान परिसरातील एका करंजच्या झाडाची पाणपक्ष्यांनी नव्याने विणीसाठी निवड केल्याचे आढळून आले. त्यामुळे घरटी असलेल्या झाडांची संख्याही ३९ झाली आहे. खाद्यटंचाईमुळे यंदा पिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचेही निदर्शनास आले आहे.
या गणनेत निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू, महाराष्ट्र पक्षीमित्र नागपूर विभागाचे विदर्भ समन्वयक राहुल वकारे, अॅड. पवन दरणे, शेखर जामूनकर, डॉ. सुशील सिरसाट, गणेश पोलकडे, प्रशांत भोयर, वासुदेव पडवे, पंचशील थूल आणि यशवंत शिवणकर सहभागी झाले होते.