69 रुपयांचे काम, मागितले 200 रुपये

सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
गडचांदूर
acb-trap उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या सरकारमान्य सेतू केंद्र चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सचिन रामचंद्र खैरे (40, रा. गडचांदूर, वार्ड क्रमांक 3) असे कारवाई करण्यात आलेल्या सेतू केंद्र चालकाचे नाव आहे. तो गडचांदूर येथील ‘त्रिशा ऑनलाईन सर्व्हिसेस’ हे सरकारमान्य सेतू केंद्र चालवतो.
 
bribe
या प्रकरणातील 52 वर्षीय तक्रारदार नागरिकाला उत्पन्नाचा दाखला आवश्यक होता. त्यासाठी त्यांनी गडचांदूर येथील त्रिशा ऑनलाईन सर्व्हिसेस या सेतू केंद्राशी संपर्क साधला. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी नियमानुसार 69 रुपये शासकीय शुल्क आकारले जाते. मात्र, सेतू केंद्र चालक सचिन खैरे याने तक्रारदाराकडे शासकीय शुल्कासह एकूण 200 रुपयांची मागणी केली.
शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 7 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने प्रकरणाची पडताळणी केली. यावेळी तक्रारदार पंचांसह सेतू केंद्रात गेले असता, सचिन खैरे याने उत्पन्नाच्या दाखल्यासाठी शासकीय शुल्कासह 200 रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 150 रुपये स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले.
 
लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सेतू केंद्रात सापळा रचला. त्यानुसार तक्रारदाराने सचिन खैरे याला शासकीय शुल्काचे 69 रुपये आणि लाचेची रक्कम 81 रुपये, असे एकूण 150 रुपये दिले. ही रक्कम त्याने पंचांसमक्ष स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले. या प्रकरणी गडचांदूर पोलिस ठाण्यात सचिन खैरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ही कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलिस अधीक्षक विजय माहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक प्रशांत केदार, पोलिस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पोलिस शिपाई अमोल सिडाम आदींनी केली.