अनुभवसंपन्न ज्येष्ठ देशाची मौलिक संपत्ती : अमृता फडणवीस

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर
amruta-fadnavis ज्येष्ठ, वृद्ध ही देशाची मौलिक संपत्ती आहे. कारण ते अनुभवसंपन्न असतात. जेव्हा एखादे रोपटे वाढते आणि त्याचे वृक्ष होते तेव्हा जग समृद्ध होते, तसे ज्येष्ठ आमच्या आयुष्यातील वटवृक्ष आहे. त्यांची सेवा हाच आमचा परमधर्म आहे, असे समाजसेविका अमृता देवेंद्र फडणवीस म्हणाल्या.
 

amruta
चंद्रपूर येथील विसापूर मार्गावर स्थित मातोश्री वृद्धाश्रमाच्या भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाला आ. किशोर जोरगेवार, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, डॉ. रजनी हजारे आदींची उपस्थिती होती. अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, लग्न करून मी फडणवीस यांच्या घरी आले, तेव्हा पहिली कतृत्ववान स्त्री म्हणून मी शोभाताई यांना पाहिले. आम्हा सर्व सुनांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आम्ही त्यांना रात्री-बेरात्री स्कुटरवर फिरताना पाहिले. नक्षलवादावर आळा घालण्यासाठीसुद्धा त्यांनी प्रयत्न केले. तसेच एकदा शोभाताई ‘किडनॅप’देखील झाल्या होत्या, अशी आठवण अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितली.
 
यावेळी आ. किशोर जोरगेवार म्हणाले, हे वृद्धाश्रम नाही तर शक्तीकेंद्र आहे. शोभाताई फडणवीस यांनी, अमृता फडणवीस यांचा परिचय करून देताना अमृता माझी सून आहे याचा मला अभिमान आहे. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत त्याहूनही त्यांची वेगळी व मोठी ओळख म्हणजे, त्या स्वत: विविध गुणसंपन्न अशा कतृत्ववान स्त्री आहेत.
यावेळी विसापूरचे सरपंच, उपसरपंच, सन्मित्र बँकेचे संचालक मंडळ, महिला भिसी ग्रृप, लाखानी ग्रृप, युवा ग्रृप, माता महाकाली महोत्सव समिती, गोंडवाना इंटरप्राईजेस यांच्यातर्फे अमृता फडणवीस यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
गरबा राष्ट्रीय उत्सव, त्यात जाती-धर्माचा भेदभाव नाही
मुस्लिम तरूणांनी नवरात्राच्या गरबामध्ये सहभागी होण्यापूर्वी हिंदू धर्म स्वीकारावा, या मंत्री नितेश राणे यांच्या विधानावर अमृता फडणवीस प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, गरबा हा राष्ट्रीय उत्सव आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही साजरा केला जातो. त्यात कोणत्याही जाती-धर्मानुरूप भेदभाव करता येत नाही. फक्त तो शांततापूर्ण साजरा व्हावा, अशी अपेक्षा असते.