मुंबई
commotion at-prime minister modi वांद्रे-कुर्ला संकुल येथील ’नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, त्याच कार्यक्रमाच्या आवारातून मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयिताकडे बंदूक सापडल्याने आणि तो स्वतःला थेट पंतप्रधान कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी सांगत असल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.
बनावट आयडी जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी एनएमएसीसी सेंटरमधून रोहन पारेख नावाच्या २४ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. रोहन पारेख हा एनएमएसीसी परिसरात अत्यंत रुबाबात वावरत होता आणि स्वतःला पीएमओ कार्यालयाचा अधिकारी असल्याचे सांगत होता. मात्र, कार्यक्रमाच्या सुरक्षेवर तैनात असलेल्या विशेष सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी जेव्हा त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून तपासणी केली, तेव्हा त्याने दाखवलेले पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे उघडकीस आले.
बॉडीगार्ड घेऊन फिरत होता बंदुकधारी
सुरक्षा यंत्रणांना सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांना समजले की, २४ वर्षांचा रोहन पारेख हा एकटा नाही तर स्वतःसोबत एका खाजगी बॉडीगार्डला घेऊन फिरत होता. त्याच्यासोबत असलेल्या या बॉडीगार्डकडे एक बंदूक देखील मिळून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हीव्हीआयपी सुरक्षा आणि एसपीजी प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे बंदुकधारी व्यक्ती आणि बनावट अधिकारी थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्याने सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई क्राईम ब्रांचकडे तपास
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या या सुरक्षेच्या मोठ्या चुकीनंतर मुंबई पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी रोहन पारेख आणि त्याच्या बंदुकधारी बॉडीगार्डला ताब्यात घेऊन कडक चौकशी सुरू केली आहे.
ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आता मुंबई पोलीस क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. हा युवक व्हीआयपी परिसरात कशासाठी शिरला होता, त्याचा मूळ हेतू काय होता आणि त्याने बनावट आयडी कार्ड कुठे बनवले, याचा शोध आता क्राईम ब्रांच घेत आहे.