मालेगाव,
maryam b sabir shah नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ च्या नगरसेवक मरियम बी साबिर शाह यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ४४ (१-ई) अन्वये नगरसेविका पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, वाशीम यांनी ४ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश पारित केला आहे.
या प्रकरणात अर्जदार आबीद खान दिलावर खान पठाण यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अपात्रतेबाबत अर्ज दाखल केला होता. नगरसेवक मरियम बी साबिर शाह यांच्या पतीच्या नावावर मालेगाव येथील गट क्रमांक १६५ मधील प्लॉट क्रमांक ३१ संदर्भात नोटरीकृत करारनामा असल्याचा दावा अर्जदाराने केला होता. तसेच संबंधित जागेवर परवानगी शिवाय अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नगरपंचायत मालेगावच्या मुख्याधिकार्याचा अहवाल, कागदपत्रे, प्रत्यक्ष स्थळ पाहणी अहवाल तसेच जिओ-टॅगिंग असलेली छायाचित्रे यांचा विचार करण्यात आला.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार, संबंधित बांधकामाबाबत नगरपंचायतीची अधिकृत परवानगी किंवा नोंद उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच नगरपंचायतीने संबंधित बांधकामाबाबत १७ फेब्रुवारी २०२६ रोजी नोटीस बजावल्याचे आदेशात नमूद आहे. सर्व उपलब्ध पुरावे व अहवालांचे मूल्यांकन केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी मरियम बी साबिर शाह यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ४४ (१-ई) अंतर्गत नगरसेवक म्हणून चालू राहण्यास अपात्र ठरविले.