कृषी पंपाची कार्यक्षमता वाढवा स्वयंचलित बटण वापर बंद करा

जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
बुलढाणा,
district collector dr pravinkumar deore पावसाने दीड महिन्यापासून दडी मारल्याने जिल्ह्यात कृषीपंपांचा वापर वाढला आहे. वीजपुरवठा सुरू होताच कृषीपंप स्वयंचलितपणे सुरू करण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी ऑटोस्विच बसविले आहेत. मात्र, एकाच रोहित्रावरील अनेक कृषीपंप एकाच वेळी सुरू झाल्याने अचानक मोठ्या प्रमाणात विद्युतभार निर्माण होतो. परिणामी रोहित्र जळणे, नादुरुस्ती, वीजवाहिन्यांवरील तारा तुटणे तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी आपल्या कृषीपंपाच्या क्षमतेनुसार योग्य क्षमतेचा कॅपेसिटर बसवावा आणि ऑटोस्विचचा वापर तात्काळ बंद करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
 
 
dr pravinkumar deore
 
कॅपेसिटरच्या वापरामुळे कृषीपंपाला आवश्यक रिअ‍ॅटिव्ह पॉवर स्थानिक पातळीवर उपलब्ध होते. त्यामुळे वीजवाहिन्यांमधून वाहणारा अतिरिक्त विद्युतप्रवाह कमी होऊन रोहित्रावरील भारही कमी होतो. कृषीपंपांमध्ये प्रामुख्याने इंडशन मोटारींचा वापर होतो. मोटार सुरू असताना वाहणार्‍या अतिरिक्त इंडटिव्ह करंटमुळे वीजवाहिन्या व रोहित्रांवर ताण वाढतो. परिणामी मोटार जळणे, रोहित्र ओव्हरलोड होणे, फॉल्ट होणे आणि एलटी लाईन ट्रिप होण्याचे प्रकार घडू शकतात. योग्य कॅपेसिटर बसविल्याने हा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होते आणि कृषीपंपाची कार्यक्षमताही सुधारते. कॅपेसिटर बसविताना तो इनकमिंग बाजूला न जोडता स्टार्टर आणि मोटारीला जोडलेल्या वायरला, म्हणजेच मोटारीपूर्वी जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे मोटार सुरू असतानाच कॅपेसिटर कार्यरत राहतो. कॅपेसिटर बसविण्यापूर्वी आणि बसविल्यानंतर केलेल्या मोजमापात विद्युतप्रवाह ४.८ अँपिअरवरून ३.३ अँपिअरपर्यंत कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी कृषीपंपाच्या क्षमतेनुसार योग्य कॅपेसिटर बसवून तसेच ऑटोस्विचचा वापर टाळून महावितरणच्या वीज यंत्रणेवरील ताण कमी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.