वैभवचा अंदाज अचूक! इशानने घेतला DRS, मिळाली महत्त्वाची विकेट

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
चेन्नई,
duleep trophy 2026 चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी २०२६च्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेटिंग सेन्सची झलक पाहायला मिळाली. ईस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिकी भुईविरुद्ध अपील झाल्यानंतर मैदानातील पंचांनी निर्णय न दिल्याने वैभवने यष्टीरक्षक इशान किशनला DRS घेण्याचा सल्ला दिला. इशानने वैभवच्या मतावर विश्वास ठेवत रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांच्या तपासणीत चेंडूचा बॅटला स्पर्श झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मैदानातील पंचांना आपला निर्णय बदलत रिकी भुईला बाद घोषित करावे लागले.
 
duleep trophy 2026
 
साऊथ झोनच्या डावातील सहाव्या षटकात हा प्रसंग घडला. त्यावेळी संघाच्या धावफलकावर १० धावा होत्या आणि मुकेश कुमार गोलंदाजी करत होता. रिकी भुईने लेग साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. कुमार कुशाग्रने झेलही घेतला, परंतु पंचांनी भुईला नाबाद ठरवले. त्यानंतर वैभवने इशान किशनला DRS घेण्यास सांगितले. रिप्लेमध्ये बॅट आणि चेंडूचा संपर्क दिसून आल्यानंतर भुईला बाद देण्यात आले. वैभवच्या या अचूक निरीक्षणाचे सोशल मीडियावर चाहते कौतुक करत आहेत.
 
दुलीप ट्रॉफीमध्ये वैभवला अद्याप शतक झळकावता आलेले नसले, तरी उपकर्णधार म्हणून त्याची मैदानावरील भूमिका प्रभावी ठरत आहे. २०२६च्या स्पर्धेत त्याने आतापर्यंत चार डाव खेळले असून एक अर्धशतक नोंदवले आहे. सेंट्रल झोनविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पहिल्या डावात त्याने ९२ धावांची खेळी करत ५७ वर्षे जुना विक्रम मोडला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात वैभव ४० धावांवर बाद झाला, तर अंतिम सामन्यात त्याने ३७ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. दरम्यान, अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ईस्ट झोनने इशान किशनच्या तब्बल २७० धावांच्या जोरावर ७०८ धावांचा मोठा डाव उभारला आहे.