तिरोडा,
electrocution from cooler proves fatal तिरोडा तालुक्यातील गुमधावडा येथे कूलरचा करंट लागून मामा व भाचीचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वनवास बाबने (मामा) आणि त्याची अंदाजे १२ ते १३ वर्षीय भाची घरात असताना अचानक कूलरच्या संपर्कात आल्याने दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पुढील तपास पोलिस करीत आहेत. एकाच घरात मामा-भाचीचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने गुमधावडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे विद्युत उपकरणांच्या सुरक्षित वापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.