मुंबई
ganeshotsav 2026 तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कारभार आपल्या हाती घेतल्यापासून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू झाला असून, विविध ठिकाणी जोरदार छापेमारी केली जात आहे. या कारवाईमुळे हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, लग्नसमारंभातील जेवणावळी तसेच कोणत्याही प्रकारच्या पंगती आयोजित करण्यापूर्वी FDAची परवानगी घेणे आवश्यक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भंडाऱ्याच्या जेवणावरही FDAची नजर राहणार असून, गणेशोत्सवात मंडळांकडून वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादाबाबतही प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांना योग्य पद्धतीने महाप्रसाद उपलब्ध करून देण्यासाठी FDAकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाप्रसादासाठी आवश्यक असलेली एसओपी निश्चित करण्यासाठी उद्या ही बैठक होणार आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर ही बैठक आयोजित करण्यात आल्याने मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने त्याला आक्षेप घेतला आहे. यापूर्वीच FDAने बैठक घेण्यासाठी पत्र दिले होते, असे समितीने म्हटले आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना महाप्रसादासाठी कंत्राटदार नेमण्यापासून इतर सर्व व्यवस्था इतक्या कमी वेळेत कशा केल्या जाणार, असा सवालही समितीने उपस्थित केला आहे.
मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समितीची भूमिका स्पष्ट केली. गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना FDAने मंडळांना बैठकीसाठी बोलावले आहे. मंडळे या बैठकीला जातील; मात्र, आपण स्वतः बैठकीला जाणार नसल्याचे दहिबावकर यांनी स्पष्ट केले. भक्तांना कोणता महाप्रसाद द्यायचा आणि त्यासाठी कोणती एसओपी असावी, याबाबत ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बैठक घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नियम लवचिक ठेवावेत आणि त्यांची सक्ती करू नये, अशी समितीची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ऐनवेळी महाप्रसादासाठी कंत्राटदार कुठून नेमायचा, हा मोठा प्रश्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीबाबतचा निर्णय महापालिका आणि शासनाने घ्यावा, अशी गणपती समन्वय समितीची भूमिका आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीचे रूप बदलले आहे, याबाबतही समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली आहे. झेनझी यांनी आमच्यासोबत यावे, ही आमची भूमिका आहे; मात्र, ते यासाठी पुढाकार घेत नाहीत, त्यांनी तो घ्यायला पाहिजे, असेही समितीच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बैठक घेत महाप्रसाद आणि भंडाऱ्यांच्या आयोजनाबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. भंडारा आयोजित करण्यापूर्वी FDAची परवानगी घेणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. FDAची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही कार्यक्रम करता येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. ज्या कार्यक्रमासाठी आचारी येणार असतील, त्या कार्यक्रमातील जेवणासाठीही FDAची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसाद, भंडारे आणि सामूहिक भोजनाच्या आयोजनावर FDAची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे.