आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एन्ट्री २८ सप्टेंबरला!

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
नागोया,
asian games आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांना २४ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीतून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. मात्र, संघात काही बदल होण्याची शक्यता अद्याप कायम आहे. क्रिकेटचे सामने रोमांचक होण्याची अपेक्षा असून भारताच्या पहिल्या सामन्याकडे विशेष लक्ष लागले आहे.
 
asian games
 
स्पर्धेतील क्रिकेटचा पहिला सामना २४ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि जपान यांच्यात होईल. याच दिवशी हाँगकाँग, चीन आणि मलेशिया यांच्यातही सामना रंगणार आहे. साखळी फेरीत एकूण सात संघ सहभागी होतील. त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटात अफगाणिस्तान, जपान आणि नेपाळ यांचा समावेश आहे, तर ‘ब’ गटात हाँगकाँग, चीन, मलेशिया आणि ओमान हे संघ आहेत.
 
साखळी फेरीनंतर २८ सप्टेंबरपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होतील. भारतीय संघ याच दिवशी आपल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात उतरेल. भारताचा सामना ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघाशी होणार आहे. त्यामुळे भारतासमोर अफगाणिस्तान, जपान किंवा नेपाळ यापैकी कोणताही संघ येऊ शकतो. सध्याच्या समीकरणानुसार जपान किंवा नेपाळविरुद्ध भारताची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जपानमध्येच असेल. २२ सप्टेंबर रोजी भारत आणि जपान यांच्यात टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांना तयारी करण्याची संधी मिळेल. भारताने २८ सप्टेंबरचा उपांत्यपूर्व सामना जिंकल्यास १ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी सुवर्णपदकासाठी अंतिम सामना होणार असून त्याच दिवशी कांस्यपदकासाठीची लढतही नियोजित आहे.
 
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे, तर तिलक वर्मा उपकर्णधार आहे. संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि वैभव सूर्यवंशी यांचा समावेश आहे.