जरांगे पाटील आक्रमक, ‘वर्षा’वर सरकारची रात्रीची धावपळ!

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
जालना
maratha reservation जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. गेल्या काही दिवसांत सरकारच्या प्रतिनिधींनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली होती. मात्र, या चर्चांनंतरही आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येऊन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर सरकारी पातळीवर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हालचालींना वेग आला आहे.
 

maratha reservation row: cm devendra fadnavis holds late-night meeting amid manoj jarange protest 
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मध्यरात्री मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही बैठक पहाटे दोन वाजता संपली. बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय देताना इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, हा मुद्दा बैठकीत प्रामुख्याने चर्चिला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रविंद्र चव्हाण आणि प्रसाद लाड हे महायुतीतील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढील दिशा काय असावी, तसेच मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी आरक्षणाच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
दरम्यान, या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेण्यात आले किंवा कोणत्या पर्यायांवर चर्चा झाली, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ‘वर्षा’वर झालेल्या या मध्यरात्रीच्या बैठकीमुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट झाले आहे.