नमन धीरचा ‘रुद्रावतार’

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
मुंबई,
naman dheers rudra avatar मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या नमन धीरने शेर-ए-पंजाब टी२० लीगमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवत धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. अमृतसर सुरमाकडून खेळताना नमनने अवघ्या ६४ चेंडूंमध्ये नाबाद १७३ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत १६ चौकार आणि १२ षटकारांचा समावेश होता. नमनच्या तुफानी फलंदाजीमुळे अमृतसर सुरमाने २० षटकांत तब्बल २७९ धावा उभारल्या.
 
naman dheers rudra avatar
 
मंगळवारी अमृतसर सुरमा आणि मोहाली किंग्स यांच्यात सामना झाला. अमृतसरच्या डावाची सुरुवात मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही. साजिद धवन केवळ एका धावेवर बाद झाला, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या राहुल कुमारने १३ धावा केल्या. जशनप्रीत सिंगने ४१ धावांचे योगदान दिले. मात्र, दुसऱ्या बाजूला नमन धीरने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांवर दबाव निर्माण केला आणि मोठी धावसंख्या उभारण्यात संघाला महत्त्वाची मदत केली.
 
नमनने आपल्या १७३ धावांच्या खेळीत २७०.३१ चा जबरदस्त स्ट्राईक रेट नोंदवला. विशेष म्हणजे, त्याने डावाच्या १२व्या षटकात केवळ ३७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. शतकानंतरही त्याचा आक्रमक खेळ कायम राहिला आणि अखेर तो नाबाद राहिला. ६४ चेंडूंच्या या खेळीत १६ चौकार आणि १२ षटकारांच्या जोरावर त्याने १७३ धावा फटकावल्या.
 
नमन धीर हा पंजाबचा असून गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. २०२४ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्या हंगामात सात सामने खेळले. त्यानंतर २०२५ आणि २०२६ मध्येही तो मुंबई इंडियन्सकडूनच खेळला. आयपीएलमध्ये आतापर्यंत नमनने ३७ सामने खेळले असून, तीन अर्धशतकांच्या मदतीने त्याच्या नावावर ७१० धावा आहेत. शेर-ए-पंजाब टी२० लीगमधील ही स्फोटक खेळी त्याच्या टी२० फलंदाजीतील आक्रमक शैलीची पुन्हा एकदा प्रचिती देणारी ठरली आहे.