बडोदा
pm modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची आणि प्रचंड क्रेझची प्रचिती पुन्हा एकदा समोर आली आहे. गुजरात राज्यातील वडोदरा येथे आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या ’नमो फॉर विकसित भारत’ या जाहीर कार्यक्रमाची सर्व मोफत तिकिटे ’बुक माय शो’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अवघ्या एका तासाच्या आत संपली आहेत. वडोदरा महानगरपालिकेने गर्दीचे नियोजन करण्यासाठी खाजगी तिकीट बुकिंग ॲपची मदत घेतली होती. तिकिटांची विक्री बंद करण्यात आली असली, तरी अजूनही तब्बल 42 हजारांहून अधिक नागरिक वेटिंग लिस्टवर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
डिजिटल क्यूआर कोडने प्रवेश
पंतप्रधान मोदींचा हा भव्य कार्यक्रम वडोदरा येथील ऐतिहासिक ’महाराजा सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी’ पॅव्हेलियन ग्राउंडवर पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे हायटेक आणि ’डिजिटल एंट्री सिस्टम’ लागू करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी बुक माय शोवर नोंदणी केली आहे, त्यांना त्यांच्या खात्यात ’एम-तिकीट’ मिळाले आहे. या तिकीटावरील लाईव्ह क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतरच मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणी, पडताळणी आणि आसनांची सोय ही सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने हाताळली जात आहे.
एका तासात तिकिटे संपण्याची पंतप्रधान मोदींची ही पहिलीच वेळ नाही. त्या आधी अमेरिकेतील ह्युस्टन येथे आयोजित ’हाउडी मोदी’ कार्यक्रमाची 50 हजारांहून अधिक तिकिटे हाऊसफुल्ल झाली होती. तसेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या कार्यक्रमाची सर्व 35 ते 40 हजार तिकिटे अवघ्या काही तासांत संपली होती.