पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
मुंबई
pm modi पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार असून, बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ते एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असतानाच, याच ठिकाणी दोन संशयितांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी एकाकडे पंतप्रधान कार्यालयाचे बनावट ओळखपत्र, तर त्याच्यासोबत असलेल्या बॉडीगार्डकडे बंदूक आढळल्याची माहिती आहे.
 

pm modi
बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कठोर तपासणी सुरू होती. त्यावेळी दोन व्यक्तींच्या वागणुकीबाबत सुरक्षा यंत्रणांना संशय आला. तपासणीदरम्यान त्यांच्याकडून कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. या दोघांपैकी एकाचे नाव २४ वर्षीय रोहन पारेख असल्याची माहिती आहे.रोहन पारेख याने सुरुवातीला आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगितल्याचे समोर आले आहे. मात्र, सुरक्षा तपासणीदरम्यान त्याच्याकडे PMO कार्यालयाचे बनावट ओळखपत्र आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट होताच मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहनला ताब्यात घेतले.
रोहनसोबत असलेल्या व्यक्तीचीही तपासणी करण्यात आली. या बॉडीगार्डकडे बंदूक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे बनावट ओळखपत्र आणि शस्त्रासह या दोघांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला, त्यांचा नेमका उद्देश काय होता आणि या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे व्हीव्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी व्हीव्हीआयपी तसेच एसपीजी कमांडो प्रोटोकॉल लागू असताना बनावट ओळखपत्राच्या आधारे आणि बंदूक घेऊन संबंधित व्यक्ती कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या दोघांचा नेमका हेतू काय होता, त्यांनी बनावट ओळखपत्र कसे मिळवले आणि शस्त्रासह कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता, याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई क्राईम ब्रँचकडून केला जात असून, तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.