आज आवतन घ्या, उद्या जेवायला या!

पोळ्यानिमित्त बैलांची खांद शेकणी

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
विजय माहुरे
सेलू
pola-festival शेतात यांत्रिकरणाने कितीही शिरकाव केला तरी शेतकर्‍यांचा खरा सखा हा बैलच आहे. शेतातील बहुतांश कामं बैलजोडी शिवाय होत नाहीच. त्यामुळे वर्षातील एक दिवस का होईना बैलांचे ऋण फेडण्यासाठी शेतकरी पोळ्याची आतुरतेने वाट पाहतात. गुरुवार १० रोजी पोळा असल्याने पोळ्याच्या आदल्या दिवशी बुधवार ९ रोजी सायंकाळी खांद शेकणी करून बैलाला आज आवतन घ्या, उद्या जेवायला या, असे म्हणत पोळ्याला जेवणाचे आमंत्रण दिल्या जाणार आहे.
 
bail pola
शेतकर्‍यांचा आवडता सण बैल पोळा गुरुवारी साजरा होणार आहे. ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीत बैल पोळ्याला महत्त्वाचे स्थान आहे. वर्षही भर खांद्यावर जू घेऊन बैलगाडी ओढत शेतातील कामं करणार्‍या बैलांचे खांदे दुखत असल्याच्या भावनेतून पोळ्याच्या पुर्वसंध्येला बैलाच्या खांद्याला तूप हळद चोळल्या जाते. पळसाच्या पानाचे देठ दिव्यावर धरून खांद्याला लावल्या जाते. खांदा शेकत असताना आज आवतन घ्या, उद्या जेवायला या, एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव... अशी साद घालत शेतकरी आपल्या बैलांना आमंत्रण देण्याची प्रथा परंपरा कायम आहे. ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या उत्साहाने पोळा सण साजरा करतो. याच सणाला शेतकरी आपल्या सालगड्याला नवीन कपडे भेट म्हणून देतात, हे विशेष!
राग नको मानू बैला...
वर्षभर बैलाकडून शेतीचे कामे केली जाते. सतत बैलाच्या खांद्यावर कामाचे ओझे असते. त्यामुळे खांद शेकणीच्या दिवशी शेतकरी ‘कासर्‍याने आवरलं, तुतारीने ढोसलं, राग नको मानू रे बैला,’ असे म्हणून बैलाला माफी मागतो.