मुंबई

पुण्यातील समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या एका व्यक्तीने लोकप्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींच्या वाहनांचे चित्रकरण करून समाज माध्यमावर प्रसारित केली. त्यामुळे जनसामान्य वर्गातही चर्चेचा विषय ठरला आहे. वाहनांवर नियमानुसार नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे. नंबर प्लेटचा आकार, अक्षरांची रचना, रंग आणि त्यावरील मजकूर याबाबत केंद्र शासनाने नियम निश्चित केले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास सामान्य वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, अनेक वेळा राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या वाहनांवर नंबर प्लेटऐवजी विशिष्ट अक्षरे, पदनाम, पक्षचिन्ह अथवा इतर प्रकारचा मजकूर आढळून येतो. त्यामुळे सर्वांसाठी नियम समान आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो.पुण्यातील या प्रकरणानंतर नियम मोडणाऱ्या सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई होत असेल, तर त्याच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय व्यक्ती अथवा लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
पहिले आवाहन, नंतर कारवाई
आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरील नंबर प्लेटची तपासणी करावी. नंबर प्लेट नियमांनुसार नसल्यास संबंधितांना प्रथम नियमानुसार नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यानंतरही संबंधितांनी नियमांचे पालन केले नाही, तर सामान्य वाहनधारकांप्रमाणेच राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.