फुटाळा फाऊंटेनसाठी लागते प्युअर पाणी!

मिस्ट सिस्टीमसाठी महामेट्रोची मागणी

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
फुटाळा तलावाचे पाणी चालणार नाही
 
नोझलची छिद्रे अतिशय बारीक
 
अशुद्ध पाण्याने जाम होण्याची भीती
नागपूर,
futala fountain फुटाळा तलाव येथे महामेट्रोद्वारे उभारण्यात येत असलेल्या व्ह्यूइंग गॅलरी आणि फाऊंटेनच्या कामाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या फाऊंटेनच्या मिस्ट सिस्टीमसाठी फुटाळा तलावाचे पाणी वापरता येणार नाही, त्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज आहे. यासाठी नागपुरकरांच्या पिण्याचे पाणी या फाउंटेनसाठी वापरले जाणार आहे.
 
 
futala fountain
 
नोझल जाम होण्याची भीती
या संदर्भात महामेट्रोच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले की, ‘फुटाळा येथे देण्यात येत असलेले फ्रेश वॉटर कनेक्शन हे फाऊंटेनच्या मुख्य वॉटर जेटसाठी नाही, तर केवळ त्याच्या मिस्ट सिस्टीमसाठी वापरण्यात येणार आहे. मिस्ट सिस्टीमचे नोझल अतिशय बारीक असतात. जर फुटाळा तलावाचे अशुद्ध पाणी वापरले तर त्यातील गाळ आणि अशुद्धतेमुळे नोझल जाम होतील. त्यामुळे वारंवार साफसफाई करावी लागेल किंवा ते बदलावेच लागतील. हा खर्च आणि देखभालीचा त्रास टाळण्यासाठीच शुद्ध पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.
 
 
प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले की, शुद्ध पाण्याची व्यवस्था केल्यास मिस्ट सिस्टीम अधिक चांगल्या प्रकारे चालेल. मिस्टमुळे पाण्याचे अतिशय बारीक थेंब तयार होतात, जे हवेत तरंगत व्ह्यूइंग गॅलरीकडे येणार्‍या पर्यटकांना थंडाव्याचा अनुभव देतात.
 
सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा
प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले की, यामागे आणखी एक कारण सार्वजनिक सुरक्षा आहे. मिस्ट सिस्टीम पाण्याचे रूपांतर अत्यंत बारीक थेंबांमध्ये करते, जे हवेत तरंगत व्ह्यूइंग गॅलरीमध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने येतात. जर दूषित पाणी वापरले तर हे दूषित थेंब श्वासावाटे शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे प्युअर वॉटर सिस्टीम ही सुरक्षेसाठीही गरजेची आहे.
नागरिकांचा आक्षेप
फुटाळा कॉलनीतील काही नागरिकांनी मात्र आक्षेप घेतला आहे की, नागपुरातच पाणी टंचाई असताना पिण्याचे शुद्ध पाणी फाऊंटेनच्या मिस्टसाठी वापरणे योग्य आहे का? यावर मनपाने अद्याप अधिकृत उत्तर दिलेले नाही. खरं तर फुटाळा तलावावर फिल्टर प्लांट उभारून ते पाणी वापरावे, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
जलवाहिनी फुटाळावासियांसाठी- वाईकर
मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर म्हणाले, ‘ही पाईपलाईन फुटाळा फाऊंटेनच्या मिस्ट सिस्टीमसाठी नाही, तर फुटाळा परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत आहे.