नवी दिल्ली,
putin visits india for brics summit रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार असून, नवी दिल्ली येथे होणाऱ्या १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी भारतीय पत्रकारांशी झालेल्या आभासी संवादात ही माहिती दिली. १२ आणि १३ सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे ही परिषद पार पडणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांशी संबंधित विविध मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुतिन ११ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार असल्याचे पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सातत्याने संपर्क असून, त्यांचे संबंध व्यावहारिक आणि विश्वासपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. द्विपक्षीय संबंधांमधील संवेदनशील विषयांसह विविध मुद्द्यांवर दोन्ही नेते मोकळेपणाने आणि विधायक पद्धतीने चर्चा करू शकतात, असेही पेस्कोव्ह यांनी सांगितले. या चर्चेमुळे भारत-रशिया सहकार्याच्या नव्या शक्यता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
ब्रिक्सच्या पुढील वाटचालीबाबतही रशियाची भूमिका पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केली. धोरण आणि सुरक्षा, आर्थिक व वित्तीय सहकार्य तसेच सांस्कृतिक आणि मानवतावादी सहकार्य या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये ब्रिक्सची भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी रशिया प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध स्वरूपात आणखी देशांना ब्रिक्समध्ये सहभागी करून घेण्याच्या विचारालाही रशियाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतात होणारी परिषद यशस्वी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भारताने यावर्षी १ जानेवारी रोजी ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले असून, या गटाचे नेतृत्व करण्याची भारताची ही चौथी वेळ आहे. २०२६ हे वर्ष ब्रिक्सच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होण्याचे वर्ष आहे. सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या चार देशांचा ‘ब्रिक’ म्हणजेच BRIC असा हा गट होता. २००६ मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्ताने या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक झाली होती. त्यानंतर २००९ मध्ये रशियातील येकातेरिनबर्ग येथे पहिली ब्रिक्स शिखर परिषद झाली. पुढे २०११ मध्ये दक्षिण आफ्रिका या गटात सहभागी झाल्यानंतर ‘ब्रिक’चे रूपांतर ‘ब्रिक्स’मध्ये झाले.