छ. संभाजीनगर,
maharashtra छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड जवळील ऐतिहासिक जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणी परिसरात एका दुर्मिळ व अत्यंत आकर्षक ‘युरोपीयन रोलर’ हा विदेशी पाहुणा दिसला. निसर्ग मित्र मंडळ आयोजित निसर्ग भ्रमंती दरम्यान पक्षीमित्र किशोर गठडी यांनी या दुर्मिळ पक्ष्यांसह तब्बल ३४ विविध प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद जागतिक स्तरावरील ‘ईबर्ड’ प्लॅटफॉर्मवर केली आहे. या मोहिमेत मंडळाचे सचिव व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे समन्वयक किशोर गठडी यांच्यासोबत निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. सर्वांनी गडाच्या समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास केला. पक्षी निरीक्षणादरम्यान एकाच वेळी दोन ‘युरोपीयन रोलर’ आणि पाच ‘स्थानिक इंडियन रोलर’ (नीलकंठ) पक्षी एकत्र पाहायला मिळाले. गडद व फिकट निळ्या चमकदार रंगांचा ‘युरोपीयन रोलर’ हवेतील सुरेख कसरतींसाठी ओळखला जातो. जंजाळा किल्ल्याच्या तटबंदीवरून उडणाऱ्या या पक्ष्याचे विहंगम दृश्य किशोर गठडी यांनी कॅमेऱ्यात टिपले.

हा पक्षी भारतात कायमस्वरूपी न राहता ‘पॅसेज मायग्रंट’ (प्रवासी पक्षी) म्हणून येतो. मध्य आशिया आणि काश्मीरमध्ये वीण झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर करताना, ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान हे पक्षी भारतात विश्रांतीसाठी थांबतात. गठडी यांनी नोंदवलेल्या ३४ प्रजातींमध्ये कपाशी घार, शिक्रा, काळी घार, भारतीय धनेश, मोर, भारद्वाज, खाटीक, चंडोल, सुतार पक्षी, कोकिळा, सुगरण, ठिपकेवाली मुनिया, पिंगळा, बुलबुल आणि कोतवाल यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पक्ष्यांचा समावेश आहे. जंजाळासारख्या ऐतिहासिक, उंच गडावर गवताळ प्रदेश आणि दऱ्यांचे संरक्षण लाभल्याने एकाच वेळी दोन युरोपीयन रोलर व ३४ प्रजाती आढळणे हे परिसराच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहे. ‘ईबर्ड’वरील या नोंदीमुळे या परिसराकडे जागतिक अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले आहे, असे मागील ४० वर्षांपासून पक्षी संवर्धनात कार्यरत असलेले किशोर गठडी म्हणाले.