अनिल कांबळे
नागपूर
rejection-of-love-proposal प्रेम प्रस्ताव नाकारल्याचा राग मनात धरून युवकाने विद्यार्थिनीच्या छायाचित्रांचा गैरवापर करीत तिचे अश्लील फोटो तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून तिची बदनामी केली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी संकेत भोगाळे (२२, रा. रमना मारोती चौक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय पीडित विद्यार्थिनीची क्रिकेट सामन्यादरम्यान संकेतशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. फोन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद सुरू होता. काही दिवसांनी संकेतने युवतीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, युवतीने हा प्रस्ताव नाकारत केवळ मैत्रीचे संबंध ठेवण्यास सांगितले. प्रेम प्रस्ताव नाकारल्याने संकेतने तिचा सोशल मीडियावर कथितपणे पाठलाग सुरू केला. त्याच्या या वर्तनामुळे त्रस्त झालेल्या युवतीने १७ ऑगस्ट रोजी नंदनवन पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजीही तिने पोलिसांत तक्रार केली होती. यावेळी पोलिसांनी तक्रारीची नोंद करून एनसी दाखल केली होती. मात्र, त्यानंतरही आरोपीने युवतीचा पाठलाग सुरूच ठेवला. त्याने तिच्या जुन्या छायाचित्रांचा गैरवापर केला. तरुणीच्या छायाचित्रांमध्ये फेरफार करीत तिचे अश्लील फोटो तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप युवतीने केला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास झालेल्या युवतीने पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी संकेत भोगाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट, छायाचित्रे आणि आरोपीच्या ऑनलाइन हालचालींची माहिती पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.
पोलिस कधी गंभीर होतील?
एखाद्या विद्यार्थिनीने पाठलाग आणि विनयभंगासारख्या प्रकाराची नंदनवन पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, नंदनवन पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली. त्यामुळे आरोपी युवकाची हिम्मत वाढली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेकडे नंदनवन पोलिस किती गंभीर नजरेने बघतात, हे अधोरेखित होत आहे. पोलिसांच्या अशाच वागणुकीमुळे महिला व मुली सुरक्षित नसल्याचे बोलले जाते.